जांबोरी मैदानावर रंगला मुंबई भाजपाचा दीपोत्सव…

0
20221024_134002

जांबोरी मैदानावर रंगला मुंबई भाजपाचा दीपोत्सव…

मुंबई, दि. 24 ऑक्टोबर :
मराठी – हिंदी गाण्यांचे सादरीकरण, दररोज एका कुटुंबाच्या चेहऱ्यावर लकी ड्रॉ मध्ये जिंकल्याचा आनंद, आवडत्या गाण्यांवर उस्फूर्तपणे ताल धरणारे कला रसिक आणि अस्सल मातीतील चव चाखण्यासाठी झालेल्या खाद्य प्रेमींच्या तुफान गर्दीने वरळी जांबोरी मैदानावरील दीपोत्सव खऱ्या अर्थाने आनंददायी अन् प्रकाशमय ठरला. मुंबई भाजपातर्फे वरळीतील जांबोरी मैदानावर सुरू असलेल्या दिवाळी महोत्सवाची रविवारी उत्साहात सांगता झाली.

या महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर, आ. मिहिर कोटेचा, गटनेते प्रभाकर शिंदे, मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे उपस्थित होते. पुष्कर श्रोत्री यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी, आ. मिहिर कोटेचा यांनी गायक आलोक काटदरे याच्यासोबत गाणे सादर केले. महोत्सवात गायक नंदेश उमप येळकोट येळकोट गजर मल्हार वारी, नवरी नटली प्रेक्षकात जात गाणे सादर करून प्रेक्षकांसह ताल धरला. त्याचप्रमाणे, माझी मैना गावाकड राहिली या लोकगीताने उमप यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या आठवणी जागवल्या.

अफजल खानाचा कोथळा काढणाऱ्या पोवाड्याच्या सादरीकरणाने उपस्थितांकडून विशेष वाहवा मिळवली. महोत्सवात आगामी मराठी सिनेमा ‘ हर हर महादेव ‘ या चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली. यात अभिनेत्री सायली संजीव, अभिनेता सुबोध भावे, अभिनेता हार्दिक जोशी, दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचा समावेश होता. कला जपण्याची परंपरा घरातून मिळाली तशी शिवाजी महाराज जपायचे संस्कार घरातून मिळाले. ज्या माणसाने सर्व गोष्टींचा त्याग करून समाजाच्या कल्याणासाठी समर्पण केले, अशी महाराजांची गाथा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे असे मनोगत अभिनेता सुबोध भावे याने व्यक्त केले. तसेच, महोत्सवाला दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर यांनी उपस्थिती लावून वरळीकरांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देत त्यांचे मन जिंकले.

या महोत्सवात शिवशंभो प्रतिष्ठान डहाणू ढोल ताशा ध्वज पथक आणि वंदन ढोल ताशा पथकातील कलाकारांच्या वादनाने रंगत आणली. तसेच, या महोत्सवाला झालेली अफाट गर्दी ड्रोनच्या सहाय्याने टिपत असताना उपस्थित सामान्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती, तर आकर्षक रंगीत प्रकाशमय आतिषबाजीने नागरिकांचे डोळे दिपले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *