राज्य सरकार ‘सारथी’ला सर्वतोपरी मदत करेल.
राज्य सरकार ‘सारथी’ला सर्वतोपरी मदत करेल.
नाशिक, दि. २१ ऑक्टोबर :
सारथीच्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून विभागातील मराठा व मराठा -कुणबी समाजातील तरूणांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून तरूणांचे भविष्य घडविण्याचे उदात्त धोरण अंगिकारणाऱ्या ‘सारथी’ ला सर्वतोपरी मदत शासनामार्फत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
छत्रपती शाहू महाराज, संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ‘सारथी’ पुणे च्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र किशोर दराडे, दिलीप बनकर, ॲड. राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, संभाजीराजे छत्रपती, सारथी चे अध्यक्ष मधुकर कोकाटे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर-पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी.पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल, सारथी चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, उपवियवस्थापकीय संचालक नितीन गावंडे तसेच पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचार, प्रेरणेतून सर्वसामान्य लोकांच्या मनातले कल्याणकारी शासन म्हणून आम्ही वचनबद्ध आहोत, त्यादृष्टिनेच काम करत आहोत. मराठा समाजातील तरूणाईला कौशल्य विकासाचे धडे देण्याबरोबरच त्यांचा शैक्षणिक, सामाजिक आणि अर्थिक विकास होण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम सारथी च्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. नाशिक येथे उभारण्यात आलेले ‘सारथी’चे हे कार्यालय केवळ एक शासकीय वास्तू नसून ते अनेक तरूणांच्या भविष्याचे शिल्पकार असलेली प्रेरणा आहे. छत्रपती शाहू महाराजांचा राजमुकुट हे सारथी चे बोधचिन्ह असून ते दीनदुबळ्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी लढायची प्रेरणा देणारे चिन्ह आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
नाशिक विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून सारथी ला आपला दृष्टिकोन केवळ कागदावरच न ठेवता तो कृतीत साकारण्याची संधी मिळाली आहे. विविध स्पर्धा परीक्षा,निरनिराळ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, कौशल्य विकास, शिष्यवृत्ती यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून तरुण व विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी यानिमित्ताने सर्वांना लाभली आहे, त्यासाठी शासन सारथी च्या सर्व आवश्यकतांची प्रतीपूर्ती करणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
व्यापक जनहितासाठी काम करत असताना प्रसंगी कुठलेही धाडसी निर्णय घेण्याची वेळ आली तरी ते घेण्याची तयारी असल्याचे सांगून जे मराठा समाजातील तरुण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होवूनही नियुक्तीपासून वंचित होते, त्यांच्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यात आली आहेत. मराठा समाजाला मिळवून देण्यासाठी जे जे काही शक्य आहे ते शासन करत राहील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
