फुटीर आमदारांना खोक्यांचा हिशेब द्यावा लागेल !

0
IMG-20221012-WA0075

फुटीर आमदारांना खोक्यांचा हिशेब द्यावा लागेल !

कोल्हापूर, दि. १२ ऑक्टोबर –

महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात अभूतपूर्व काम केले, ज्याची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली. कर्जमाफी देण्याचा निर्णय आम्ही सर्वप्रथम घेतला, कोविडच्या काळात देशभरात कौतुक होईल इतके काम केले. मात्र कपटाने सरकार पाडण्यात आले अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

फुटीर आमदारांच्या मतदारसंघात फिरून आल्यानंतर लोकांच्या मनात संतापाची लाट आहे असे सांगतानाच लोकं यांना धडा शिकवायला तयार आहेत. यांचे डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती आहे. हे आमदार निवडणुकांसाठी जेव्हा बाहेर पडतील, तेव्हा त्यांना खोक्यांचा हिशेब द्यावा लागेल असे स्पष्ट करतानाच अशा परिस्थितीत आपण आपला महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येईल यासाठी प्रयत्न करावा असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

ज्याला मुख्यमंत्री व्हायचे होते त्याला उपमुख्यमंत्री केले आणि ज्याला उपमुख्यमंत्री व्हायचे होते त्याला मुख्यमंत्री केले असा टोला लगावतानाच त्यांचा कारभार फक्त एका वर्षाचा आहे असे भाकीतही जयंत पाटील यांनी केले.

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाराष्ट्राला प्रत्येक गोष्टीत कमीपणा घ्यावा लागत आहे. महाविकास आघाडी सरकारने वेदांताचा प्रकल्प खेचून महाराष्ट्रात आणला होता तो प्रकल्प आज या सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे गुजरातला गेला. इतरही प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून इतर राज्यात जात आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.

आज महागाईमुळे नागरीक प्रचंड त्रस्त आहेत. बेरोजगारीमुळे तरुण मंडळी हैराण झाली आहे मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही. या देशातील मीडियाही त्यावर प्रकाश टाकण्याची तसदी घेत नाही. मात्र काहीही झाले तरी सूर्य उगवायचा राहत नाही. त्यामुळे लवकरच परिवर्तन होईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भुदरगड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्रीचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांचा नागरी सत्कार सोहळा व शेतकरी युवक कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

श्री दुधगंगा -वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने देशात पहिला नंबर पटकावला आहे. त्याबद्दल के. पी. पाटील आणि सर्व संचालकांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन केले. राज्यातील इतर कारखान्यांना हेवा वाटेल अशी प्रगती श्री दुधगंगा – वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने केली आहे. या संस्थेने अधिकाअधिक प्रगती करावी अशा शुभेच्छाही दिल्या.

२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत ही जागा थोड्याशा फरकाने आपण गमावली. लोकांना वाटत होतं की, या निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यश येणार नाही मात्र आम्ही चांगली कामगिरीही केली व पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही सत्तेतही परतलो असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *