Ads

-

एसटी चालक, वाहक भरतीमधील उमेदवारांना नियुक्ती पत्र.

By Xtralarge News

October 5, 2022 1:58 pm

Ads

एसटी चालक, वाहक भरतीमधील उमेदवारांना नियुक्ती पत्र….

मुंबई, दि. 5 ऑक्टोबर :
एसटीतील २०१९ अंतर्गत चालक, वाहक पदाच्या भरतीतील पात्र पुरूष व महिला उमेदवारांना राज्य शासनाने दसऱ्याची भेट दिली आहे. या भरतीप्रक्रियेतील पात्र उमेदवारांपैकी २७ पुरूष उमदेवारांना नेमणुकीचे तर २२ महिलांना सेवापूर्व प्रशिक्षणाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले. एसटी महामंडळाच्या निर्णयामुळे या भरतीप्रक्रियेतील पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य परिवहन महामंडळामध्ये २०१९ मध्ये चालक, वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतील १४३१ पात्र उमेदवारांना यापूर्वीच नेमणूक देण्यात आली आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे दोन वषापासून रखडलेल्या उर्वरीत पात्र उमेदवारांच्या नेमणुकीला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला होता. त्यानुसार मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याचा कार्यक्रम पार पडला. पात्र उमेदवारांपैकी आज २७ पुरूष उमेदवारांना नेमणूकीचे पत्र देण्यात आले असून उर्वरीत उमेदवारांना लवकरच नेमणूक देण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एसटी महामंडळाने राबविलेल्या भरती प्रक्रियेत चालक, वाहक पदासाठी महिलांकडूनही अर्ज मागविले होते. यामध्ये २०३ महिला उमेदवार लेखी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या असून १४२ महिला उमेदवारांनी अवजड वाहन चालविण्याचा परवाना सादर केला आहे. यापैकी २२ महिला उमेदवारांना आज  मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सेवापूर्व प्रशिक्षणाचे पत्र देण्यात आले. ८० दिवसांचे सेवापूर्व प्रशिक्षण घेतल्यानंतर या महिला एसटीचे सारथ्य करण्यास सज्ज होणार आहेत.

No comments to show.

Leave a Comment