रेशन दुकानातून १०० रुपयात साखर, डाळ, रवा व पामतेल !
रेशन दुकानातून १०० रुपयात साखर, डाळ, रवा व पामतेल !
मुंबई, दि. ४ ऑक्टोबर;
शिंदे-फडणवीस सरकारने सर्वसामान्य लोकांची दिवाळी गोड करण्याच्यादृष्टीने रेशन दुकानातून केवळ १०० रुपयामध्ये दिवाळी पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रवा, चणाडाळ, साखर प्रत्येकी एक किलो व १ लिटर पामतेल देण्यात येणार आहे. रेशनकार्ड असणाऱ्यांना हे पॅकेज मिळणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे ८ कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ४८६ कोटी ९४ लाख खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे.
या वस्तू दिवाळीपूर्वी वाटप करता याव्यात तसेच कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
