Ads

---

‘मातोश्री’ला पत्र पाठवुन महादूध आंदोलनाचा प्रारंभ!

By Xtralarge News

August 18, 2020 5:44 pm

Ads

लोणी दि.१८ ऑगस्ट.

निष्‍क्रीय आणि निद्रीस्‍त महाविकास आ‍घाडी सरकारमुळे राज्‍यातील शेतक-यांवर ‘मागण्‍यांचा पोळा’ साजरा करण्‍याची वेळ आली असल्‍याचा आरोप माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी करुन दूध उत्‍पादकांच्‍या मागण्‍या तातडीने मान्‍य कराव्‍यात यासाठी मुख्‍यमंत्र्यांच्‍या मातोश्री निवासस्‍थानी पत्र पाठवुन महादूध आंदोलनाचा प्रारंभ केला.

राज्‍यातील दूध उत्‍पादकांच्‍या मागण्‍यांसाठी भा.ज.पा महायुतीच्‍या वतीने मुख्‍यमंत्र्यांना ५ लाख पत्र पाठविण्‍याचे महादूध आंदोलन सुरु करण्‍यात आले आहे. नगर जिल्‍ह्यातील आंदोलनाची सुरुवात माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली लोणी बुद्रूक येथील पोष्‍ट कार्यालयातून पत्र पाठवून करण्‍यात आली. पोळ्याचा आनंददायी सण असतानाही शेतक-यांना आपल्‍या मागण्‍यांसाठी रस्‍त्‍यावर येण्‍यास भाग पाडणा-या महाविकास आघाडी सरकारचा त्‍यांनी तिव्र शब्‍दात निषेध केला.

प्रारंभी आ.विखे पाटील आणि त्‍यांच्‍या कुटूंबियांनी गोधनाचे पुजन करुन अतिशय साध्‍या पध्‍दतीने पोळा सण साजरा केला. त्‍यानंतर लोणी बुद्रूक पोस्‍ट कार्यालयासमोर झालेल्‍या या आंदोलनात माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, भा.ज.पा चे उत्‍तर नगर जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, तालुका अध्‍यक्ष नंदकुमार जेजूरकर, ट्रक्‍स वाहतुक सोसायटीचे चेअरमन नंदु राठी, किसनराव विखे, सुभाषराव विखे, सोसायटीचे चेअरमन सी.एम विखे, संपतराव विखे, एम.वाय विखे, विक्रांत विखे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्‍य अनिल विखे, सरपंच लक्ष्‍मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, एन.डी विखे, रावसाहेब साबळे, भाऊसाहेब विखे, शंकर विखे, गणेश विखे आदिंसह दूध उत्‍पादक शेतक-यांनी पोष्‍ट कार्यालयात येवून मागण्‍यांचे पत्र मुख्‍यमंत्र्यांना पाठविले.

याप्रसंगी बोलताना आ.विखे पाटील म्‍हणाले की, बैल पोळ्याचा सण हा बळीराजासाठी आनंदाचा दिवस असतो. परंतू या नाकर्त्‍या सरकारमुळे शेतक-यांच्‍या नशिबी दु:खाचे सावट आहे. आव्‍हानात्‍मक परिस्थितीत शेतकरी सण साजरा करतोय. सर्जा राजाला सजवून मिरवण्‍याचा दिवस असतानासुध्‍दा शेतक-यांना रस्‍त्‍यावर उतरुन मागण्‍यांचा पोळा साजरा करण्‍याची वेळ या सरकारने आणली हे दुर्दैवी असल्‍याचे सांगितले. यापुर्वी राज्‍यात दूध उत्‍पादकांचे रस्‍त्‍यावर उतरुन आंदोलने झाली. सरकार निर्णय घेईल, घोषणा करील अशी अपेक्षा दूध उत्‍पाकांची होती. परंतू सरकारचे वेळकाढू धोरणामुळे दूध उत्‍पादकांची चेष्‍टाच सुरु असल्‍याची टीका त्‍यांनी केली.

महीना उलटून गेल्‍यानंतर महाविकास आघाडी सरकार दूध उत्‍पादक शेतक-यांना न्‍याय देवू शकलेले नाही. सरकारमध्‍ये सहभागी असलेले मंत्री आणि शेतक-यांचा कैवार असलेले दूध उत्‍पादकांच्‍या प्रश्‍नांवर बोलायला तयार नाही. म्‍हणूनच निद्रीस्‍त आणि निष्‍क्रीय असलेल्‍या सरकारला जागे करण्‍यासाठी आणि मुख्‍यमंत्र्यांना दूध उत्‍पादकांचे दु:ख समजावे म्हणून पोळा सणाच्‍या दिवशी मुख्‍यमंत्र्यांना दूध उत्‍पादकांच्‍या मागण्‍यांचे पत्र पाठवून महादूध आंदोलन आजपासुन सुरु केले असून, राज्‍यातून ५ लाख आणि नगर जिल्‍ह्यातून१० हजार पत्र पाठविणार असल्‍याचे आ.विखे पाटील यांनी सांगितले.

No comments to show.

Leave a Comment