महात्मा जोतीराव फुले यांचे विचार आजही अतिशय उपयुक्त

0
IMG-20220926-WA0106

महात्मा जोतीराव फुले यांचे विचार आजही अतिशय उपयुक्त…

नाशिक, दि. 27 सप्टेंबर :-
महात्मा जोतीराव फुले यांचा विचार हा परिवर्तनाचा, विज्ञानाचा पुरस्कार करणारा, समाजातील शेवटच्या माणसाचे हित जोपासणारा व त्यांच्या दु:खांची मांडणी करणारा विचार आहे तो वाढविला पाहिजे, अधिक वृद्धिंगत करायला हवा. महात्मा फुले यांचे हे विचार आजच्या काळातही समाजाच्या उभारणीसाठी अत्यंत उपयुक्त असून त्यांचे हे विचार देशातील शेवटच्या तरुणाच्या मनात रुजविण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.

महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला १५० वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे राज्यातील सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांचा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे,सदानंद मंडलिक, प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, शहराध्यक्ष कविता कर्डक, जिल्हाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर दराडे, डॉ. योगेश गोसावी, महिला जिल्हाध्यक्षा पूजा आहेर, शहराध्यक्ष आशा भंदूरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, सबंध समाजामध्ये अवैज्ञानिक परंपरा, अंधश्रद्धा, स्त्रीदास्य पद्धती, ब्राह्मण्य, अमानवी व माणुसकीला काळिमा फासणारे प्रकार देशात सुरु होते. यावेळी भगवान गौतम बुद्धांनी याला विरोध करून सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले यांनी याच सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जातीभेद आणि अन्याय याची परिसीमा त्या काळी गाठली गेली होती अशावेळी धार्मिक आणि सामाजिक सुधारणा असा दुहेरी भाव सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून मांडला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.

महात्मा फुले यांनी गुलामगिरी, अस्पृश्यता, स्त्री दास्य, जनावरांच्या हत्या याला विरोध केला. व्यसनापासून दूर रहावे अशी शिकवण त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून दिली. सत्यशोधक समाजाचा केवळ आणि सामाजिक सुधारणा हा हेतू नव्हता तर लोकप्रबोधन, शिक्षण सुधारणा, शेतकरी हित, सावकारी उच्चाटन यासह अनेक प्रश्नांवर काम केले असल्याचे सांगत  महात्मा फुले यांनी मांडलेला शेती विज्ञानवादी विचार हा अतिशय महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले कि, महात्मा फुले यांचे हे विचार पुढे छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भावराव पाटील यांच्यसह अनेक समाजसुधारकांनी रुजविले असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून त्याचा जीर्नोधार केला. तसेच त्यांच्यावर पोवाडा तयार करून सत्य जगासमोर मांडले असे शरद पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *