20200817_211002

सातारा, दि. १७ ऑगस्ट…..

कोरोनाने अख्खे जग मेटाकुटीला आले आहे. दररोजचे आकडे ऐकूनच पोटात गोळा येतो. बहुतांश खाजगी हॉस्पिटल्स व डॉक्टरांनी दुकान बंद करून पळ काढला आहे. या संकटाने माणसाला माणसापासून दूर केले आहे. नाती दूर झाली आहेत…पण यातही काही लोक असे आहेत ज्यांचा हेवा वाटतो, देवदुतासारखे हे लोक कोरोनाच्या संकटातही मदतीसाठी पुढे आले आहेत.

सातारा जिल्ह्यातील अशाच काही मंडळींनी या संकट काळी मदतकार्यात झोकून दिले आहे. हे आहेत खंडाळा तालुक्यातील कोपर्डे गावातील समिर रविंद्र शिंदे मित्र परिवार….खंडाळा तालुका हा पुण्याजवळचा तालुका. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या असल्यामुळे पुण्यातून ये-जा करणारे अनेक कर्मचारी आहेत. आज खंडाळा तालुक्यासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळत असले तरी कोपर्डे हे खंडाळा तालुक्यातील गाव याला अपवाद आहे. याचे श्रेय समिर रविंद्र शिंदे मित्र परिवाराला जाते. हा शिंदे परिवार आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी व कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून अहोरात्र झटत आहेत.

समिर शिंदे हे या परिवाराचे प्रमुख असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शुभम शिंदे, निलेश बोडरे, विक्रम साळुंखे, अजित बोडरे, अविनाश शिंदे, विशाल बोडरे, रोहित शिंदे, प्रमोद शिंदे यांच्यासह आशा सेविका यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत. या परिवाराला खंडाळ्याचे गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे.

कोरोना संकटाच्या काळात आपण काही तरी समाजाचे देणे लागतो म्हणून हा परिवार गेल्या दोन महिन्यांपासून अहोरात्र काम करीत आहे. या परिवारातील सदस्य दररोज गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी करतात. कुणाला ताप, जुलाब, उलटी, बी.पी. शुगर, कोणते छोटे-मोठे आजार आहेत याची खात्री करुन त्यांना शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेली औषधे घरपोच केली जातात. जी औषधे शासकीय रुग्णालयात उपलब्ध नाहीत ती औषधे बाहेरच्या मेडिकलमधून आणायला सांगितले जाते.

कापेर्डे गावातील बहुतांश नागरिकांना बी. पी. आणि शुगरचा त्रास तसेच अंगदुखी, थंडी-ताप असे किरकोळ आजार असल्याचे घरोघरी केलेल्या सर्व्हेतून या परिवाराच्या लक्षात आले.

खंडाळा तालुक्यातील बऱ्याच ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला आहे, परंतु समिर रविंद्र शिंदे मित्र परिवाराच्या केलेल्या कामामुळे आजतर कोपर्डे गावात एकही कोरोनाचा रुग्ण नाही,  हे या परिवाराचे यश म्हणावे लागेल. या परिवारावाकडून नुसती आरोग्य तपासणीच केली जात नाही तर नागरिकांना कोरोना संसर्गापासून बचाव कसा करायचा यासाठी सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर, स्वच्छतेचेही महत्व पटवून दिले जाते आहे. समिर रविंद्र शिंदे मित्र परिवाराच्या कामाची जिल्हा प्रशासनानेही दखल घेतली असून त्यांच्या कामाचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कौतुक केले आहे.

अशा प्रकारे गावा-गावात प्रशासनाच्या हातात हात घालून काम करणारे युवक, विविध संघटना यांनी पुढे येण्याची गरज आहे. शिंदे परिवाराच्या कामातून प्रेरणा घेऊन गावोगावी असे उपक्रम झाले तर कोरोनावर मात करणे अशक्य नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *