• Tue. Feb 27th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 716 Today: 1 Total: 3422459

काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा कशासाठी?

मुंबई, दि. १२ सप्टेंबर:

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रा सुरू झाली असुन ही यात्रा काश्मीरपर्यंत जाणार आहे. १५० दिवसांच्या या पदयात्रेमध्ये राहुल गांधी यांच्यासह ११८ पदयात्री पुर्णवेळ सहभागी झाले आहेत तसेच राज्याराज्यात हजारो लोक उस्फुर्तपणे या पदयात्रेत सहभागी होत आहेत. एकुण पदयात्री पैकी १/३ महिला आहेत. या सर्वांचे सरासरी वय ३८ वर्षे असुन यामध्ये महाराष्ट्रातील ९ पदयात्री पुर्णवेळ सहभागी आहेत. याशिवाय स्वयंसेवी संस्थांचे अनेक प्रतिनिधी आणि सिविल सोसायटीचे प्रतिनिधी देखील यात सहभागी आहेत. ही काही काँग्रेस पक्षाची पदयात्रा नाही. मात्र आर्थिक, सामाजिक व राजकीय पातळीवर देशाला तोडणाऱ्या शक्तीविरुद्ध जनमत जागृत करणाऱ्या या यात्रेत समविचारी व्यक्ती आणि संस्था सहभागी झालेल्या आहेत. दिडशे दिवस व ३५७० किलोमीटर हे पदयात्री अंतर चालणार आहेत. “महाराष्ट्रात” भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी प्रवेश करणार असून नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यातून हे पदयात्री प्रवास करणार आहेत. एकूण १६ दिवस ही यात्रा महाराष्ट्रात असणार आहे. नांदेड आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यात जाहीर सभा होतील.

भारत जोडो यात्रेला कन्याकुमारीपासून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या समर्थक, अंधभक्तांचे धाबे दणाणले आहे. आयोजकांनी देशापुढील “बेरोजगारी व महागाई” या महत्त्वाच्या समस्यांवर व त्याबाबत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची भुमिका घेतल्यामुळे अंधभक्तांकडून व परीवाराकडून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी “कोणता टी शर्ट घातला” आणि “कोणते शूज घातले”, असे बालीश प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परिवारातील एका अंधभक्त मित्राने मला दोन दिवसापूर्वी विचारले की “तुम्ही काँग्रेसवाले आता भारत जोडो यात्रा काढताय? मग भारत देश तुटलाय का?,” या त्याच्या आणि त्याच्यासारख्या इतरांच्याही खोचक प्रश्नाला आपण सर्वांनी ठणकावून उत्तर दिले पाहिजे, “हो, तुमच्या अकार्यक्षमतेमुळे आणि सत्तालोलुपतेमुळे, माझा भारत देश तुटलाय आणि तो देखील तीन प्रकारे तुटलाय.”

१) माझा भारत देश “आर्थिकदृष्ट्या तुटला” आहे. २०१४ साली भारतीय जनता पक्षाने अनेक खोटी स्वप्ने दाखवून सत्ता हस्तगत केली. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देऊ, अशी आवेशपूर्ण भाषणातून लोणकढी थाप मारली आणि देशातील गोरगरीब जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवला. स्वतंत्र भारताच्या इतिहासात देशातील गरीबांची एवढी राष्ट्रव्यापी फसवणूक प्रथमच झाली.

एक वेळ आपण असेही समजू की निवडणुकीच्या प्रचारात असे बोलावे लागते. पण २०१४ ते २०२२ काळातील देशाची ढासळलेली आर्थिकस्थिती, नोटबंदीसारखा अविवेकी निर्णय, लहान व्यापारी, व्यावसायिक यांना भरडून टाकणारा GST, यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. २०१४ साली  ४५०/- रुपयांना मिळणारा घरगुती वापराचा गॅससाठी आज १०५०/- रुपये मोजावे लागतात. २०१४ साली ६२ रुपये प्रती लिटर दराने मिळणारे पेट्रोल आज केव्हाच शंभरी पार करून गेले आहे. पेट्रोल व डिझेल मधील ही राक्षसी भाववाढ प्रत्येक वस्तुंचे भाव वाढण्यास कारणीभुत ठरली आहे. सरकार जर म्हणत असेल की देशाची प्रगती झाली तर मग देशातील सामान्य माणसाची व गरिबांची प्रगती व्हायला पाहिजे. मात्र उलट  सरकारच्या काही निवडक मित्रांचीच प्रगती झालेली दिसून येते. याचे एकच उदाहरण वस्तूस्थिती स्पष्ट करण्यासाठी पुरेसे आहे. २०१४ साली जागतिक स्तरावर श्रीमंतांच्या यादीत २२८ व्या क्रमांकावर असलेले उद्योगपती अदानी हे आज जगातले ३ ऱ्या क्रमांकाचे श्रीमंत म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. भारतीय माणूस श्रीमंतांच्या यादीत पुढे आला याचा खरं तर आनंदच व्हायला हवा पण गरिबांचे शोषण करून निर्माण झालेली ही श्रीमंती सामान्य माणसांच्या आर्थिक वेदनांवर मीठ चोळणारी आहे. देशातील एक दोन व्यक्ती जागतिक स्तरावर श्रीमंत होत असताना देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या मात्र २७% पर्यंत पोहचली आहे आणि म्हणूनच देशातील आर्थिक विषमता प्रचंड प्रमाणात वाढली असून सामान्य नागरिक हा आर्थिकदृष्ट्या तुटला गेला आहे. गरिबातल्या गरीब माणसाकडून देखील सरकार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराद्वारे त्याच्या उत्पन्नापैकी ३०% पेक्षा जास्त रक्कम कर म्हणून वसूल करत आहे. त्यामुळे गरिबांचे शोषण करून श्रीमंतांचे खिसे भरणाऱ्या सरकारची ही कृती ब्रिटिश सत्तेच्या शोषणापेक्षाही अत्यंत भयानक आहे. दारिद्र्यामुळे आणि गरिबीमुळे तुटून पडलेल्या सामान्य माणसाला जोडण्यासाठी ही भारत जोडो यात्रा आहे. सरकारने दरवर्षी अडीच कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मागील आठ वर्षात नव्या नोकऱ्या तर सोडाच, पण दरवर्षी ४० लाखापेक्षा जास्त लोक बेरोजगार होत आहेत. एकीकडे महागाईचा भस्मासूराने प्रचंड अक्राळविक्राळ रुप धारण केले असतानाच दुसरीकडे बेरोजगारी देखील ४१% पर्यंत वाढली आहे. अशा या भीषण परिस्थितीत गरिबांना, बेरोजगारांना, शेतकऱ्यांना, महिलांना, युवकांना,आदीवासी, मागासवर्गीय अशा सर्वांना जोडण्यासाठी ही भारत जोडो यात्रा आहे

२) देशाच्या स्वातंत्र्यानंतर मागील ७५ वर्षात प्रथमच देश “सामाजिकदृष्ट्या तुटला”आहे. देशात सामाजिक असहिष्णुतेचे वातावरण उच्चतम स्तरावर असून विविध जाती धर्मांमध्ये भांडणे लावली जात आहेत. देशासमोरील मूलभूत “बेरोजगारी आणि महागाई” यासारख्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून धार्मिक वादाचे विषय मुद्दाम उकरून काढले जात आहेत. त्यामुळे देशात अनेक वर्षापासून गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई यांच्यामध्ये परस्पर अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न केला जात आहे.  सरकारला असे वाटते, की लोक “बेरोजगारी आणि महागाई” याबाबतच्या अपयशाकडे दुर्लक्ष करतील परंतु भारत जोडो यात्रेद्वारे लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात जनजागृती होत आहे आणि त्याच उद्देशाने भारत जोडो यात्रेचे मार्गक्रमण सुरू आहे.

३) कधी नव्हे तो आपला देश “राजकीयदृष्ट्या देखील तुटला” आहे. खरे तर संपूर्ण जगामध्ये सर्वात भक्कम लोकशाहीचा सर्वात मोठा देश म्हणून भारत देश परिचित आहे. मात्र मागील काही महिन्यात देशाची घटना आणि घटनात्मक संस्था यांना धक्का देऊन सत्तेचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. मग सर्वोच्च न्यायालय असो, निवडणूक आयोग असो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असो, ईडी सारखे डिपार्टमेंट असो, सीबीआय असो, या सर्वांचा गैरवापर करुन सरकार विरोधकांमध्ये दहशत व भय निर्माण करीत आहे. याच पध्दतीने प्रसार माध्यमांना देखील आपल्या दडपशाहीने सध्या हुकूमशाहीचा अनुभव दिला जात आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न, लोकांच्या भावना या ना संसदेत मांडता येतात, ना वर्तमानपत्रात मांडता येतात, ना आंदोलनाद्वारे मांडता येतात. अशी हुकूमशाही सदृश परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. त्यामुळे आता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे हे प्रश्न घेऊन जनतेच्या दारात जाण्याचा एकमेव मार्ग भारत जोडो यात्रेद्वारे स्वीकारला गेला आहे. आणि तो मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे. त्यामुळे ही भारत जोडो यात्रा देशाच्या दृष्टीने एक “परिवर्तनकारी घटना” ठरणार आहे. महात्मा गांधींनी केलेल्या अनेक पदयात्रांपेक्षा कदाचित मोठी ठरणारी ही भारत जोडो यात्रा २०२४ च्या दृष्टीने Game Changer ठरली तर आश्चर्य वाटु नये.

त्यामुळे अंधभक्तांनी आणि त्यांच्या पगारी सोशल मिडीयाने कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी देशातील सुजाण नागरिकांनी आता मंदिर, मशीद, धर्म , जात यापेक्षा “बेरोजगारी आणि महागाई”बाबत सरकारला प्रश्न विचारण्याचा निर्धार केला आहे. भारताचे सुजाण नागरिक या नात्याने जर आपण आता असे प्रश्न विचारले नाहीत तर पुढील पिढीचे भवितव्य उध्वस्त होणार आहे. आजच सामान्य माणसाला, मग तो व्यापारी असो, शेतकरी असो, विद्यार्थी असो, सामान्य नागरिक असो, यांना त्यांचे दैनंदिन जगणे अत्यंत अवघड झाले आहे. महिनाभराच्या उत्पन्नात स्वत:चे कुटुंब चालविताना आणि त्याचे नियोजन करताना त्याचा जीव मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे आता जागे व्हा आणि देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक अशा भारत जोडो यात्रेत आपल्या क्षमतेप्रमाणे सहभागी व्हा. अन्यथा भावी पिढी आपणास माफ करणार नाही.

 

लेखक- विनायकराव देशमुख

सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *