मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न…
मुंबई , दि. 11 सप्टेंबर :-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १२ तारखेला संभाजीनगरला सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेला प्रतिसाद मिळणार नाही हे माहित असल्याने मंत्री संदीपान भुमरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. लोकांनी सभेला उपस्थित रहावे म्हणून त्यांना पैसे दिले जात आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा गंभीर आरोप केला. “जिल्हा परिषद अंगणवाडी सेविका यांना सभेला उपस्थित राहण्याचे आदेश दिले असल्याचे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. अशाप्रकारे सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होत असून या सभेसाठी बोलवण्यात आलेल्यांच रेटकार्ड प्रसिद्ध झाले आहे. यानुसार सभेला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत,” असे दानवे म्हणाले.
शिंदे फडणवीस सरकारने अतिवृष्टी पीडितांना ३ हजार कोटींची मदत योजना जाहीर केली आहे. अतिवृष्टी पीडितांना मदतीचे निकष 1 हेक्टरने वाढवून सुद्धा प्रत्यक्षात मदतीची रक्कम कमी करण्यात आली आहे. अद्याप अनेक नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्यात आला नाही. सरकार एकप्रकारे आकड्यांचा खेळ करतेय. पिकांच्या प्रतवारी नुसार मदत करणं आवश्यक असताना सरकारने तुटपुंजी मदतीची फसवी घोषणा केल्याची टीका दानवे यांनी केली आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले,पूल वाहून गेले,त्याला कोणती मदत नाही देण्यात आली नाही, त्यामुळे सर्वच नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे करा अशी मागणी दानवे यांनी केली.
इगतपुरी येथे आदिवासींची मुलं ही वेठबिगारीसाठी विक्री करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशाप्रकारे विक्री केलेल्या एका अल्पवयीन मुलीला अत्यवस्थ अवस्थेत आणून टाकण्यात आले त्यात त्या मुलीचा मृत्यू झाला आहे.
“या गंभीर प्रकरणाची साधी दखल ना सरकारने घेतली आणि ना सरकारने गुन्हे दाखल केले! यावरून सरकार आदिवासी समाजाच्या समस्यांबाबत असंवेदनशील असल्याचं स्पष्ट होते,” अशी टीका विरोधी पक्षनेते दानवे यांनी केली.
आदिवासी समजाच्या विकासासाठीच्या योजना फक्त कागदावरंच असून प्रत्यक्षात त्यांना कोणतीच मदत मिळत नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.
