अमित शाह यांना उद्धव ठाकरेंनी ‘असे’ दिले उत्तर !
अमित शाह यांना उद्धव ठाकरेंनी ‘असे’ दिले उत्तर !
मुंबई, दि. ७ सप्टेंबर:
केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी मुंबई दौऱ्यात उद्धव ठाकरे यांना जागा दाखवण्याचा इशारा देऊन महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकवण्याचे आवाहन केल्यानंतर शिवसेनेही आक्रमक प्रतिक्रिया दिला आहे. आता शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अमित शाह यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती दोन्ही बघितल्या आपण, ते मंगलमूर्तीच्या दर्शनाला आले होते. ती मंगलमूर्ती आहे तिथे अभद्र काही बोलू नये पण ते बोलून गेले. गणपतीच्या मंडळामध्येसुद्धा त्यांना राजकारण दिसले त्याला आपण काही करु शकत नाही. मी एवढे सांगेन की गणपती हा बुद्धीदाता आहे. सर्वांना त्याने सुबुद्धी द्यावी हीच माझी गणरायाकडे प्रार्थना आहे, अशी खोचक टोला उद्धव यांनी लगावला.
शिवसेनेला जमीन दाखवायची असे ते बोलून गले, दाखवा. ती जमीन दाखवल्यानंतर त्यावर काय बोलायचे ते बोलू. थोडक्यात सांगायचे तर आता संघर्षाचा काळ आहे. शिवसेना ते संपवायला निघालेले आहेत. या संघर्षाच्या काळात जो सोबत राहतो तो आपला. भास्करराव, रविंद्र वायकर, अनिल परब, सुनिल प्रभू आणि इतर आमदार येथे आहेत. या आमदारांना ते लालूच दाखवून नेऊ शकत होते. का नाही नेऊ शकले? कारण शेवटी निष्ठा हा असा विषय असतो की तो कोणी कितीही बोली लावली तरी तो विकला जाऊ शकत नाही आणि कोणी विकतही घेऊ शकत नाही. त्यामुळे हे सर्व निष्ठावान सोबत राहिले.
बाळासाहेब सांगायचे तसेच नासलेली लोक असण्यापेक्षा मूठभर का असेना निष्ठावान असले तरी मैदान निघते सगळं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राजकारणात सारे काही सोसले तरी दगाबाजी सहन करू नका. जे दगा देतात, त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतील राजकारणात भाजपाचे वर्चस्व दाखविण्याची आणि उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे, असे अमित शाह मुंबईत भेटीवेळी भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले होते.
