आता उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा
आता उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा
मुंबई, दि. ६ सप्टेंबर:
राजकारणात सगळे काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचे असावे. भाजपा आणि जनतेला दगा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये भुईसपाट करा, धोका देणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी आक्रमक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिका घेतली.
शिवसेनेत मोठी फुट पाडून उद्धव ठाकरेंचे सरकार पाडल्यानंतर आता भाजपाचे लक्ष्य मुंबई महापालिकेतून शिवसेनेचा झेंडा उतवणे हे आहे. यासाठी मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आस्मान दाखवण्यास सांगितले. उद्धव ठाकरे यांनीच भाजपाशी गद्दारी केली आपण मुख्यमंत्रीपदाचा कोणताच शब्द दिला नव्हता असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत १५० जागा जिंकण्याचे टार्गेट भाजपाने ठेवले आहे. मागील निवडणुकीत शिवसेना व भाजपामधील जागांमध्ये फारसा फरक नव्हता. यावेळी मागील जिंकलेल्या जागा अधिक मित्रपक्षांची मदत घेत १५० चा टप्पा पार करण्याचे गणित आखण्यात आले आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्यासाठी शेवटची निवडणूक आहे असे समजून लढा असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले. त्यामुळे मुंबईवर झेंडा फडवकून ठाकरेंचे मुंबईवरचे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी भाजपा कामाला लागला आहे.
अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यात लालबागचा राजाचे दर्शन घेतले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आशिष शेलार यांच्या घरच्या गणपतींचेही दर्शन घेतले याबरोबरच भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
