ए. एम. नाईक विद्यालय परिपूर्ण विद्येचे संकुल
ए. एम. नाईक विद्यालय परिपूर्ण विद्येचे संकुल…
मुंबई, दि. 6 सप्टेंबर :
जीवनाच्या सुरुवातीला ए. एम. नाईक यांनी पायाभूत सुविधांच्या निर्मितीत योगदान दिले आणि आता ते व्यक्ती निर्माणाच्या क्षेत्रात सुरुवात करत आहेत. या विद्यालयाच्या माध्यमातून देशाला चांगले नागरिक देण्याचा त्यांचा हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद असून त्यातून माणूस घडविण्याचे काम केले जाईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. ते पवई येथील ए. एम. नाईक चॅरिटेबल ट्रस्ट विद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, ए. एम. नाईक शाळेच्या उद्घाटनासाठीच मी मुंबईत आलो आहे. शिक्षक दिन आहे; राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय शिक्षण पद्धतीतील मूळ तत्वांना जगभरात पोहोचविण्याचे काम केले. आज जेव्हा राष्ट्रीय शिक्षण पद्धती – २०२० ची चर्चा होते; तेव्हा डॉ. राधाकृष्णन यांच्या भाषणाचे संकलन केले असता प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षणात त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब दिसते. त्यावेळी त्या महामानवाने कशी शिक्षण पद्धती असावी याचा विचार केला होता. पण दुर्दैवाची बाब अशी की, त्याची अंमलबजावणी व्हायला बराच काळ लागला. ते महान शिक्षक आणि विद्वान होते. ते मानवतावादी आणि दूरदृष्टी ठेवणारे व्यक्तिमत्व होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य देशातील नव्हे तर संपूर्ण जगातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी खर्ची घातले. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या शिक्षकांना विनंती आहे की, आदर्श गुरू कसा असावा आणि आपली शिक्षण पद्धती कशी असावी हे समजून घेण्यासाठी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या ग्रंथ संपदेचा आवर्जून अभ्यास करावा.
अल्पमती विद्यार्थी गुरूच्या सानिध्यात येतो तेव्हा त्याला अल्पमतीतून गुरुमतिकडे जाण्यासाठी सहाय्य करतो तो खरा गुरू. इतकी साधी सोपी व्याख्या डॉ. राधाकृष्णन यांनी मांडली आहे. तुमच्या जवळ येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुभव नसतो; त्यांना चांगल्या वाईटाची समज नसते त्यामुळे या विद्यार्थ्यांना घडविण्याची शिक्षकांची जबाबदारी असून त्यांना देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी आत्मनिर्भर बनविले पाहिजे. सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची ग्रंथसंपदा आवर्जून वाचावी. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्की होईल. ए. एम. नाईक यांच्या राष्ट्रनिर्मितीसाठी असणाऱ्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. एल. अँड टी. साठीही त्यांचा मोलाचा वाटा आहे. आज नवी शिक्षण पद्धती वास्तवात उतरताना पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. ए. एम. नाईक विद्यालय परिपूर्ण विद्येचे संकुल आहे. श्री. नाईक यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात व्यक्ती घडविण्याचे काम हाती घेतले आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे ते यात यशस्वी होतील असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.
