सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे पूरग्रस्त मदतीपासून वंचित…

0
IMG-20220905-WA0086

सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे पूरग्रस्त मदतीपासून वंचित…

नाशिक, दि. 5 सप्टेंबर-
राज्य सरकारचा निष्काळजीपणा व अकार्यक्षमतेमुळे नाशिकसह राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत मिळण्यास विलंब होत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते दानवे यांनी नाशिक जिल्ह्यातील ता. वांजरवाडी व सिन्नर येथील पूरपरिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला त्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते.

एकप्रकारे सरकारची प्रशासनावरील पकड  ढिली झाल्याने पूरग्रस्तांना मदत मिळण्यास उशीर होत असून याला सरकारच जबाबदार आहे. पूर ओसरून आठवडा झाला तरी पूरग्रस्त नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याने नागरिक, शेतकरी यांना अद्याप मदत मिळाली नाही. तहसीलदार ते जिल्हाधिकारी यांच्याकडे अद्याप पंचनामे आले नसल्याचे समोर आले आहे. नाशिक व सिन्नर शहरात मोठया प्रमाणात नागरिकांचे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. असे असतानाही सरकारी यंत्रणा प्रभावीपणे काम करताना दिसत नाही.

पूरग्रस्तांना सरकारकडून मदत मिळत नाही. मात्र शिवसेना त्यांच्या मदतीसाठी उभी राहील अशी ग्वाही दानवे यांनी दिली. सिन्नर तालुक्यात अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या कुसुमबाई तानाजी घोरपडे व कविता गडक यांच्या घरांच्या नुकसानाची पाहणी दानवे यांनी केली. या पुरामुळे नागरीकांचे घरं वाहून गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत, त्यांना तात्काळ निवारा व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध झाल्या पाहिजेत अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

सोनंबे ता. सिन्नर येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या दुर्गम भागात असलेल्या गुरदरी बंधाऱ्याची पाहणी दानवे यांनी ट्रॅक्टरने काही अंतर जाऊन  व नंतर पुढे पायी चालत केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत  अधिकाऱ्यांना बंधाऱ्याचे कामही तातडीने हाती घेण्याच्या सूचना केल्या.

यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार योगेश बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर,तालुकाप्रमुख  ज्ञानेश्वर गाडे, सोनांबे गावचे सरपंच डॉ.रवींद्र पवार, स्थानिक गावकरी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *