आबांचे ‘ते’ वक्तव्य आणि राजकारणाची खरी गोष्ट..

0
20200817_121631

वरिष्ठ पत्रकार रफिक मुल्ला यांचा विशेष लेख…..

मुंबई, दि.17 ऑगस्ट…..

आर. आर. पाटील उर्फ आबा, एक दुर्मिळ राजकारणी-सामान्य-गरीब कुटुंबातून मोठा झालेला. त्यांच्या अवेळी जाण्याने त्यांच्या विचारांशी सहमत असलेले-नसलेले सगळेच हळहळले. त्यांच्या प्रतिमेला साजेशा आठवणी सगळ्यांच्या मनात आहेत. २६-११च्या हल्ल्यानंतर त्यांनी केलेले ते वादग्रस्त वक्तव्यं आणि त्यानंतर घडलेलं राजकारण यामुळेही ते अनेकांना वेळोवेळी आठवतात. तसंच त्यांच्या तंबाखूच्या सवयीमुळेही… सामान्य कुटुंबातून आलेल्या किंवा राजकीय वारसा-पाठबळ नसलेल्या राजकारणी व्यक्तींचे काय हाल होतात यापासून ते सगळी यंत्रणा हाताशी असताना किंवा सत्तेच्या जवळ असलेले राजकारणी-अधिकारी-पत्रकार ज्या गोष्टी गृहीत धरतात, त्यामुळे कसा घात होतो- याची चर्चा आर.आर.यांच्या स्मरण दिनानिमीत्ताने करणं गरजेचे आहे. याअनुषंगाने ‘त्या’ वक्तव्यामागे असलेली खरी गोष्टही सांगितली पाहिजे.

आर.आर. पाटील यांची राजकारणी बनण्यापर्यंत आणि पुढे आमदार होण्यापर्यंतची कहाणी महाराष्ट्र जाणतो. त्यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून केलेले काम त्यांच्या स्वभाव आणि प्रतिमेला साजेसं होतं. त्यातून ते देशभर पोहोचले. पुढे प्रसिद्धीच्या शिखरावर असताना ‘झी’वरील हल्ला प्रकरणाच्या निमित्ताने तेलगी प्रकरणात बदनाम झालेल्या छगन भुजबळांचे मंत्रीपद गेले आणि आर.आर.पाटील अचानक गृहमंत्री झाले. त्यानंतर अल्पावधीत वर्दीतल्या कडक सैल्युटला भाळलेल्या आबांचा संघर्ष सुरु झाला तो शेवटपर्यंत कायम राहिला.

स्वच्छ प्रतिमेच्या आर.आर.ना पक्षाने गृहमंत्री म्हणून निवडले, पक्षाची तेव्हा ती गरज होती. खरंतर आर. आर. यांना मिळणारी प्रसिद्धी आणि सन्मानामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची पहिली फळी त्यांच्यावर फार जळत असे, इतके की त्यांच्या विभागाने घेतलेल्या निर्णयांची पूर्ती होणार नाही, अशा शक्य त्या सर्व अडचणी निर्माण केल्या जात असत. सामान्य पार्श्वभूमी असल्याचा हा एक मोठाच त्रास..! उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना सरकारमध्ये पक्षाचे नेतृत्व करावे लागे आणि बाहेर पक्षाचे संघटनात्मक कामही. पक्षासाठी तेव्हा सर्वाधिक राबणारेही आर.आर.च… पक्षातले इतर सगळे मातब्बर-मोठ्या नेत्यांचा वारसा असलेले आणि सहकार-खाजगी दोन्ही क्षेत्रात मोठे आर्थिक पर्यायाने सामाजिक पाठबळ देणा-या संस्थाचे मालक..! तुलनेत आर.आर. सामान्य लोकांच्या पाठींब्यावर व्यापक प्रतिमा निर्माण करुन कष्टाने उभे राहीलेले.. ही गुणवत्ता असल्याने पक्षाध्यक्ष शरद पवारांचा पाठीवर हात..तरीही अडचणी कमी कधीच नव्हत्या. त्यामुळे ते सरकार आणि पक्षात फार राबत असत. त्यातून वेळेवर जेवण नाही, वरुन तंबाखूचे व्यसन…! तंबाखू खूप व्हायची. पक्षाध्यक्षांचे अनुकरण करुन गुटख्याची पावडर मिक्स करुन तंबाखू खाण्याची सवय जडलेली..बहुतेकदा मिसळ-पाव, वडा-पाव असं मिळेल ते मागवून खाणे आणि काम करत राहणे.. पहिल्यांदा लोकांसाठी, नंतर पक्षातल्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि नंतर गृहमंत्री पदाचे झालेले ओझे संभाळत.. प्रतिमा साधी, राहणी साधी, स्वभाव संवेदनशील पण त्याला टिपिकल गावातला बेरकीपणाची जोड..चांगला नेता म्हणून निर्माण झालेली प्रतिमा सतत जपण्याचा प्रयत्न, तेच भांडवल असल्याने ती प्रतिमा कायम रहावी याची सततची काळजी.. पण मंत्री गृहविभागाचे.. सगळा चिखल आणि घाण…प्रतिमा आणि काम यातून निर्माण झालेली कसरत दिवसेंदिवस वाढत गेली..!
ते दिर्घकाळ गृहमंत्री राहीले..त्यांच्या कारकीर्दीत बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या, गुजरात दंगलीचे पडसाद कालांतराने मुंबईमध्ये उमटले. गडचिरोलीला मोठे नक्षलवादी हल्लेही झाले. गृहमंत्री म्हणून त्या प्रत्येक हल्ल्यानंतर दिलेल्या वैयक्तिक मुलाखतीत ते एक वाक्य आवर्जुन बोलायचे. ” एवढ्या घटना आम्ही रोखतो, त्यातून सुटून अशी एखादी घटना घडणार…” लक्षात यायचे हे वाक्य चुकीचे आहे. एकही घटना घडू नये, अशी व्यवस्था ठेवण्याची जवाबदारी सत्ताधा-यांची..! तरीही माणूस आणि हेतू वाईट नाही असे समजून सरसकट त्यांची मुलाखत दाखवली जात असे.
२६-११ चा हल्ला झाला आणि ते फार अडचणीत आले. तेव्हा उठलेल्या तीक्ष्ण राजकीय प्रतिक्रियांची तीव्रता त्यांनी विरोधात बसलेल्या शिवसेना-भाजप स्टाईलने कमी केली. ट्रायडंट हॉटेलातली चकमक संपल्यावर “भारत माता की जय” च्या घोषणा दिल्या, काहीही हातात नसताना असे काय करावे ज्यामुळे स्थिती अनुकूल राहिल, याचे गणित त्यांनाही नेमकेपणाने कळले होते.. जेव्हा एकूण विषय केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्याकडे वळला, त्या दरम्यान इकडे आबांनी आपल्यावर काही येऊ नये यासाठीचे शक्यतो सर्व प्रयत्न केले, माध्यमांमध्ये बातम्यांमुळे सुरु असलेली नकारात्मकता कमी करण्याचा प्रयत्न केला, कुठे-कधी-कुणावर काय उपकार केले असतील त्या सर्व पत्रकारांची मदत घेतली. ताजमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांचा खात्मा झाल्यावर सकाळी सहयाद्री गेस्ट हाऊसवर पत्रकार परिषद बोलावली गेली..मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हजार…मुख्यमंत्री विलासराव देशमुख नेमके बोलून दिल्लीकडे रवाना झाले आणि अघळ-पघळ बोलत उपमुख्यमंत्री, पुन्हा तेच वाक्य बोलून गेले. पण यावेळी हिंदीत… नेमके वाक्य होते- “इतने बडे शहर में,एखाद हादसा हो जाता है.” त्यांना सांगायचे होते की, ही अपवाद म्हणून घडलेली घटना आहे, आम्ही फार काम करतो त्यातून असंख्य घटना घडू देत नाही.. प्रेस कॉन्फरन्स अर्धवट सोडून झी २४ तासवर बातमी लावली. खूप वेळ लाइव्ह आणि फोन इनमुळे कुणाचा संपर्क झाला नाही. तासाभरानंतर पाहिले तर आबांसह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे मिस कॉल पडले होते..तेवढ्यात पुन्हा आर.आर यांचा फोन आला.”अरे हे काय, मला तसे म्हणायचे नव्हते. माझे हिंदी ठिक नाही. ती बातमी परत घ्या. मी म्हणालो, “आपण असंख्यवेळा असे बोलला आहात हा हल्ला अपवाद नाही. गेले अडीच दिवस आम्हीही प्रत्येक क्षण दहशत अनुभवली आहे. प्रेतांचा खच पाहिला आहे.” हा हल्ला अपवाद मानावा असा नव्हताच.. पण आबांना वेळ मारून न्यायची होती. आता ते कुणालाही शक्य नव्हते. एक चांगला सामान्य माणूस राजकारणाच्या या उंचीपर्यंत पोहोचला आणि आता पद वाचवण्याची धडपड करतो आहे- ही फार बरी वाटणारी गोष्ट नव्हती.. अर्थात त्यांच्याकडे अशी प्रतिमा वाचवण्यापेक्षा दुसरा कोणताही पर्याय नव्हता…त्यांना पुन्हा पुन्हा कुणीही संधी देणार नव्हतं..अशा पद्धतीने पद गेलं की आपण संपलो, असं त्यांना स्वाभाविकपणे वाटायचे..वारसा नसेल..जात-धर्माची अडचण असेल तर, गुणवत्ता असली तरी संधी मिळत नाही..चुकून मिळाली तर ती टिकत नाही..काही काळ टिकली आणि नंतर गेली की पुन्हा मिळत नाही..! कोणत्याही क्षेत्रात असेच आहे..राजकारणात तर फारच कठीण..!!  गृहमंत्रीपद त्यांचा स्वभाव नव्हता. खरा स्वभाव ग्रामविकासचाच…पण ते खाकीच्या प्रेमात पडले. २००४ च्या निवडणुकीत सर्वाधिक काम केलेले आर.आर.,राष्ट्रवादीच्या विजयाचे शिल्पकार होते. काँग्रेस सोबत आघाडी केल्यानंतर पक्षाने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर ते आर.आर.नांच द्यावं लागलं असतं..तेव्हाच अजित पवार यांनी झी २४ ताससाठी मला दिलेल्या मुलाखतीत, मुख्यमंत्री बनण्याची इच्छा उघड बोलून दाखवली. पक्षातली ही स्पर्धा जड़ जाईल की काय असे वाटून शरद पवार यांनी कच खाल्ली. अधिक आणि शेलकी मंत्रीपदं घेऊन कमी जागा असुनही काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं. पक्षाच्या वाट्याला आलेलं उपमुख्यमंत्रीपद मात्र आर.आर. पाटील यांना दिलं..

ते पद २६-११ च्या हल्ल्यानंतर गेलं.. अशा घटना घडल्यावर पद काढून घेतलं की समजावं-पक्षश्रेष्ठी दिर्घकाळ संधीची वाट पाहत होते. पद काढून घेण्यास एखादी बातमी किंवा वक्तव्यं नव्हे तर अनेक घटना कारणीभूत असतात..!
विरोधकांनी तोपर्यंत त्यांचा SRK केला होता. “बडे बडे शहर में, ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है..” असा त्यांच्या वक्तव्याचा प्रवास घडवला होता. बहुजन वजा मराठा राजकारणाची त्यांची लाईन असल्याने संघ-भाजप दिर्घकाळ टपून होता- शेवटी ती संधी त्यांना मिळालीच..त्यानंतर मंत्रीपद गेल्यावर पक्षाध्यक्ष झालेले आबा फार दुखावले गेले..पदाचा मोह सुटला होता..पण पुन्हा निवडणुकीत त्यांनी जोमाने काम केले. २००९ ला पुन्हा सत्ता आल्यावर पक्षाने त्यांना परत गृहमंत्री केले..ते विजयी हाऊन परतले. ज्या लॉबीने २६-११ नंतर निमित्त करुन माझा गेम केला त्यातील बहुतेकांचा हिशोब चुकता केल्याचे त्यांनी काही दिवसानंतर मला सांगितले. तो इशारा होता. पुढे माझ्याविरोधात शोधूनही त्यांना काही सापडले नाही. थेट गृहमंत्र्यांशी झालेल्या लढाईचा कठीण काळ आला, काही बिघडले नाही उलट फार शिकता आले..!
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान तोंडात गाठ आल्याचे त्यांना जाणवलं. यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी किमान दोन आकडी खासदार संख्या आणावी म्हणून ते त्या निवडणुकीत जोमाने काम करत राहीले. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्या मतदारसंघात मतांची संख्या पाहता ते आमदार म्हणून पुन्हा निवडून येणे अवघड आहे, अशा चर्चा सुरु झाली. त्यामुळे ते रुग्णालयाएवजी मतदारसंघात व्यस्त झाले..विधानसभा निवडणुकीनंतर उपचार घेऊ,असा त्यांनी निर्णय घेतला. तो पक्षाध्यक्षांसह सर्वांनी सांगितले तरी त्यांनी बदलला नाही. आपल्याला चांगल्या दर्जाचे नीट उपचार मिळू शकतील, असा त्यांना विश्वास होता. त्यापेक्षा त्यांनी ते गृहीत धरलं आणि निवडणुका संपल्यानंतर उपचारासाठी दाखल झाले..तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

शिवसेनाप्रमुखांचा १९९५ मध्ये राज्यात सत्ता आणल्याचा आनंद मोठा होता- त्यानंतर मात्र लगेच पत्नी गेल्याचे मोठे दु:खही त्यांच्या वाट्याला आले. मातोश्री ते लिलावती रुग्णालयापर्यंतचे छोटेसे अंतर वेळेत गाठता आले नाही, याची मोठी खंत त्यांना होती. दिल्लीत व्यस्त विलासराव देशमुखांनीही आपल्या आजारावर तातडीने उपचार घेतले नाहीत. सर्व शक्य असताना हे असं सगळ्यांचे ‘गृहीत’ धरणं ठिक नव्हते..आबांनीही असं गृहीत धरलं…
आज पक्षाला आणि एकूण चळवळीला आर.आर.पाटीलांची आठवण येते आहे. कशात तरी अडकवले जाईल म्हणून घाबरुन बसलेले किंवा आमिषाला बळी पडलेले देशभरातील भाजपविरोधी पक्षातील नेते पाहता, ही भीती नसलेला आणि ख-या अर्थाने फकीर असलेला नेता म्हणूनही आर.आर. पाटील यांची आठवण काढणारे कमी नाहीत. तशा लढाया करण्यात ते तरबेज होते. १९९५ च्या युती सरकारविरोधात त्यांनी दिलेला एकहाती लढा सगळ्यांच्या स्मरणात आहे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *