शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा ?
शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात आवाज कुणाचा ?
मुंबई, दि. ३ सप्टेंबर:
शिवसेना, दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे समिकरण मागील ५६ वर्ष कायम आहे परंतु यावर्षी शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार यावरून वाद सुरु आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून वेगळी वाट धरल्याने उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शिंदेसेना यांच्यात वाद सुरु आहेत. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होऊ नये यासाठी राजकारण सुरु असल्याचे दिसत आहे. शिवसेनेने आधीच दसरा मेळाव्यासाठी रितसर अर्ज केलेला आहे असे असताना आता शिंदे गटानेही शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्याची तयारी चालवली आहे.
महानगरपालिकेकडे शिवसेनेचा अर्ज आधीच गेलेला असताना शिंदे गटानेही अर्ज केला आहे. महानगरपालिका यावर निर्णय घेत असते पण नगरविकास खाते व मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे त्यामुळे अधिकारी कोणाला परवानगी देतात याकडे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार अशी ठाम भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतली आहे तर राज ठाकरे यांना शिंदे यांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून आणायचा प्रयत्न चालला आहे. या वादात मनसेने उडी घेत राज ठाकरे यांनीही दसरा मेळावा घ्यावा असे आवाहन केले आहे.
या सर्व वादात शिवाजी पार्कवर कोणाचा आवाज घुमणार याची उत्सुकता लागली आहे.
