‘वर्षा’ व ‘तोरणा’वर तैनात पोलीसांना दर्जेदार सुविधा पुरवा
‘वर्षा’ व ‘तोरणा’वर तैनात पोलीसांना दर्जेदार सुविधा पुरवा..
मुंबई, दि. 1 सप्टेंबर :
मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानाशेजारी असलेल्या ‘तोरणा’ बंगल्याचे नूतनीकरण करताना सुरक्षेसाठी तैनात पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधांची निर्मिती करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले.
‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम पोलीस बांधवांच्या सोयी-सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश डावकर यांच्यासह तोरणा बंगल्याची पाहणी केली.
‘वर्षा’ आणि ‘तोरणा’ या शासकीय निवासस्थानी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना दर्जेदार सुविधा पुरविण्यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष पुरवले असून या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी अभ्यास कक्ष, दुमजली बेड, वातानुकूलित यंत्रे, ध्यानधारणेसाठी कक्ष अशा सुविधांचे काम तात्काळ हाती घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि इतर सुविधा लवकरात लवकर पुरविण्याचे निर्देश देतानाच हे काम रेंगाळणार नाही याची दक्षता घेण्याच्याही सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.
मुख्यमंत्री शिंदे यांना पोलीस दल आणि त्यातील अधिकारी- कर्मचाऱ्यांबद्दल विशेष प्रेम आहे, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवतानाच जनतेच्या जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजे हा त्यांचा सतत आग्रह असतो, त्यामुळेच गेली अनेक वर्षे तोरणा बंगल्यात असुविधेच्या गर्तेत अडकलेल्या पोलीसांना दर्जेदार सुविधा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. बीडीडी चाळीतील रहिवाशी असणाऱ्या पोलीस कुटुंबांना केवळ बांधकामाच्या खर्चात म्हणजे १५ लाखांत घर देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांबद्दलच्या कृतज्ञतेचे उत्तम उदाहरण आहे.
