कार्यक्रम मेट्रो-३ च्या चाचणीचा पण निशाणा मात्र ठाकरेंवर !
कार्यक्रम मेट्रो-३ च्या चाचणीचा पण निशाणा मात्र ठाकरेंवर !
मुंबई, दि. ३० ऑगस्ट:
विघ्नहर्त्याने या राज्यावरील बरीचशी विघ्ने दूर केली आहेत त्यामुळे आता विघ्ने येतील असे मला वाटत नाही. मेट्रो- ३ प्रकल्पामुळे आता राजकीय प्रदूषणही बंद होईल. आता पूर्ण बॅटिंग करण्यासाठी अडीच वर्ष आहेत. त्यामुळे कमी चेंडूत अधिक धावा करायच्या आहेत. अश्विनी भिडे यांनी आव्हानांची चिंता करू नये. आम्ही देखील सगळी आव्हाने पार करत हे नवीन सरकार स्थापन केले असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रो-3 च्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला, त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शिवसेना व उद्धव ठाकरेंवर टीका केली.
सार्वजनिक वाहतूक चांगली असेल तर त्याचा वापर सगळे करतील. आमचे सरकार आल्यानंतर अश्विनी भिडे यांना मेट्रोची जबाबदारी देण्याचा पहिला आदेश काढला. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पाला अनेकांनी विरोध केला होता पण हा प्रकल्प सुरू केला. मुंबई मेट्रो हा मुंबईकरांच्या हिताचा प्रकल्प आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीवर हा मेट्रो प्रकल्प रामबाण उपाय ठरेल. पर्यावरणाचा समतोल राखणे हे सगळ्यांचे काम आहे. या ठिकाणी तीन रस्ते आहेत. जंगलात जाऊन पूर्णपणे वृक्षतोडी झालेली नाही. या प्रकल्पाची स्थगिती आम्ही उठवली आणि काम सुरू केले. लोकांच्या हितासाठी असणारे प्रकल्प पूर्ण करणार असेही त्यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक कामे सुरू झाली तसेच पाच वर्षात या प्रकल्पांनी मोठी प्रगती केली. मीही त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उदाहरण मी देईन. मला त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की आपल्याला हा प्रकल्प पुढे न्यायचा आहे. तेव्हा अनेक लोकांनी विरोध केला, अनेकांनी अडथळे आणले. या प्रकल्पाचा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण या महाराष्ट्रातील भागाला होणार आहे. देवेंद्र फडणवीसांकडे इच्छाशक्ती होती आणि मग मी त्याप्रमाणे काम केले असेही शिंदे म्हणाले.
