दगाफटका करून नाही तर बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो !
दगाफटका करून नाही तर बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो !
मुंबई, दि. २३ ऑगस्ट;
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून चाळीस आमदारांसह उद्धव ठाकरेंची साथ सोडली. शिवसेनेतील बंडखोरीच्या चर्चेत राज ठाकरे यांचेही नाव जोडले जात असताना आपण शिवसेना सोडली दगाफटका केला नाही तर बाहेर पडून स्वतःचा पक्ष काढला, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मनसेच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले, छगन भुजबळ, नारायण राणे, एकनाथ शिंदे यांच्या बंडासोबत माझ्या त्या निर्णयाशी तुलना करू नका. छगन भुजबळ, नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडत दुसऱ्या पक्षात सामिल झाले. मी मात्र बाळासाहेब ठाकरे यांना सांगून बाहेर पडलो.
बाळासाहेब ठाकरे यांना कळलं की मी आता शिवसेनेत राहणार नाही. शिवसेना सोडण्याआधी मला त्यांनी भेटण्यासाठी बोलावलं होतं. मनोहर जोशी यांच्यासोबतची बैठक संपल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावले आणि खोलीत गेल्यानंतर त्यांनी मला मिठी मारली आणि आता जा, असे म्हणाले. मी पक्ष सोडतोय हे त्यांना कळलं होतं. मी दगाफटका करून, पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडलो नाही आणि कार्यकर्त्यांच्या बळावर नवीन पक्ष स्थापन केला असे राज ठाकरे यांनी सांगितले.
माझ्याकडे बाळासाहेबांचे नाव नाही, चिन्ह नाही, विचार आहेत आणि हे विचार महत्वाचे आहेत, हा विचारांचा वारसा पुढे न्यायचा आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
