‘त्या’ शेतक-यांना वे.को.लि.ने त्वरित नुकसान भरपाई द्यावी !
‘त्या’ शेतक-यांना वे. को.लि.ने त्वरित नुकसान भरपाई द्यावी !
चंद्रपूर, दि. 20 ऑगस्ट :
वे.को.लि.च्या कृत्यांमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साठून तसेच अन्य नुकसान झाले आहे, त्याची त्वरीत भरपाई द्यावी, तसेच ज्यांच्या जमिनी कायमस्वरूपी बाद झाल्या आहेत, त्यांना तातडीने नोकरीत सामावून घ्यावे, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वे.को.लि.च्या अधिकाऱ्यांना दिले.
वे.को.लि.ने उकणी शिव खंड एक मधील शेतीच्या आजूबाजूला मातीचे ढिगारे उभे केले आहे. नैसर्गिक नाल्याचाही प्रवाह वेकोलीच्या खाणीमुळे बंद झाल्याने सन 2019 पासून परिसरातील शेतात पाणी साचत आहे. कोळसा खाणीच्या चुकीच्या नियोजनामुळे येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे वेकोलीने येथील शेतकऱ्यांना आवश्यक ती नुकसान भरपाई त्वरित द्यावी, असे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले.
चंद्रपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात वे.को.लि, घुग्गुस संदर्भात आढावा बैठक झाली त्याप्रसंगी त्यांनी हे निर्देश जारी केले.
उकणी, निवली व लाठी या गावालगत व परिसरातील संपूर्ण शेती चार वर्षापासून पाण्याखाली जात आहे. त्यामुळे येथील जमीन शेतीलायक राहिलेली नाही. येथील शेतकऱ्यांना सन 2019 ते 2022 या चार वर्षापर्यंतची नुकसान भरपाई तातडीने द्यावी, असे त्यांनी सांगितले आहे. नुकसान भरपाई देताना चार वर्षाअगोदर येथील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत मालाची विक्री केली असेल त्याचा आधार घ्यावा, भूधारकांना कंपनीच्या नोकरीत सामावून घेण्याची कारवाई 1 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी असेही आदेश श्री.मुनगंटीवार यांनी दिले आहेत. तसेच संबंधित भूमी अधिग्रहण करण्याची कार्यवाहीही लगेच करावी, अशा सूचनाही त्यांनी वे.को.लि. कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, वे.को.लि. वणी क्षेत्राचे जनरल मॅनेजर उदय कावळे, प्लॅनिंग ऑफिसर रोहित मेश्राम, अधीक्षक एम. वाय. पुरडकर तसेच संबंधित उकणी, निवली व लाठी या गावातील भुधारक प्रामुख्याने उपस्थित होते.
