‘घरोघरी तिरंगा’ व ‘स्वराज्य महोत्सवा’साठी यंत्रणा सज्ज

0
IMG-20220802-WA0059

‘घरोघरी तिरंगा’ व ‘स्वराज्य महोत्सवा’साठी यंत्रणा सज्ज…

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा’ कार्यक्रम आणि ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या स्वराज्य महोत्सवासाठी राज्य शासनाच्या यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात आयोजित ‘आजादी का अमृत महोत्सव’ राष्ट्रीय समितीच्या तिसऱ्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

राज्यातील दोन कोटी घरांवर तिरंगा झेंडा फडकविण्याची योजना आहे. यासाठी खाजगी व्यापारी, अन्य संस्था आणि  केंद्र शासनाच्या माध्यमातून १ कोटी झेंडे उपलब्ध होणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण विकास विभागासाठी अपर मुख्य सचिव आणि नगर विकास विभागासाठी प्रधान सचिवांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांकडून या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वेळोवेळी आढावा बैठकाही घेण्यात येत आहेत. या अभियानांतर्गंत विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने ३५.४५ कोटींचा निधी जिल्हा स्तरावर वितरीत करण्यात आला आहे.

स्वराज्य महोत्सवांतर्गंत राज्य, जिल्हा,तालुका आणि ग्राम व  वार्ड स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखण्यात आली आहे. ग्रामस्तरावर आणि वॉर्ड स्तरावर विशेष सभांचे आयोजन, शाळा महाविद्यालये, अंगणवाडया, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था,महिला बचत गट,शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक आदिंच्या सहकार्याने हा कार्यक्रम राज्यात राबविण्यात येणार आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील १८ जिल्हयांमध्ये विविध ४२ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पुढील वर्षाच्या १५ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाअंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यात मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानाहून राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाच्या ग्रामीण विभागाच्या माध्यमातून ग्रामस्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती अपलोड करण्यात येत आहे व देशात सर्वाधिक कार्यक्रमांचे आयोजन करून महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान मिळविले आहे. या कार्यक्रमांतर्गत मागील वर्षी २५ डिसेंबर रोजी ‘नदी उत्सव’ साजरा झाला तसेच राज्य शासनाने या कार्यक्रमाची माहिती व प्रसिध्दी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी mahaamrut.org हे संकेतस्थळ तयार केले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. राज्यशासनाच्या विविध विभागांद्वारे आयोजित करण्यात आलेल्या महत्वाच्या कार्यक्रमाविषयीही त्यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *