मराठी माणसाच्या घरांच्या स्वप्नांचा खून करणाऱ्यांंची चौकशी

0
IMG-20220802-WA0052

मराठी माणसाच्या घरांच्या स्वप्नांचा खून करणाऱ्यांंची चौकशी

मुंबई, दि. 2 ऑगस्ट :

ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, ज्यांनी गोरेगाव मधील 672 मराठी कुटुंबांच्या घरांच्या स्वप्नांचा खून केला, ज्यांच्या हातांना 672 मराठी माणसाच्या घरांच्या स्वप्नांच्या खूनाचे रक्त लागलेय अशा उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदारांची चौकशी सुरु आहे. ही सूडबुद्धीने केलेली कारवाई नाही, तर मराठी माणसाला फसवणाऱ्यांची सडकून, सडेतोड केलेली चौकशी आहे, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार  आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना झालेल्या अटकेच्या कारवाईबाबत भाजपावर झालेल्या टीकेचा समाचार घेत आशिष शेलार यांनी भाजपाची भूमिका मांडली.

गोरेगावच्या पत्रा चाळीतील 672 मराठी कुटुंबांंच्या घरांच्या स्वप्नांचा खून करण्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा थेट संबंध दिसून आला आहे. सदर शासनाच्या जागेचा अपव्यय करण्यात आला, म्हाडाच्या मालकीच्या जमिनीवर अनधिकृतपणे तिसऱ्या माणसाचा मालकी हक्क निर्माण करणे, 1 हजार 39 कोटी रुपयांचा अपव्यय करणे, 672 मराठी कुटुंबांंना घरे खाली करण्यासाठी मनी, मसल पाॅवरचा वापर करणे, त्यासाठी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मदत करणे, नवीन बांधकामात घरे देतो असे सांगून 138 कोटी रुपये गोळा करून त्याचा अपव्यय करणे, त्यासाठी पुन्हा युनियन बँक ऑफ इंडिया कडून 100 कोटीचे आणि ILFS कडून 215 कोटींचे कर्ज घेऊन ठेवीदारांच्या पैशाचा अपव्यय करणे, त्यानंतर ही प्रकल्प पुर्ण न करणे अशा गंभीर स्वरूपाचे हे प्रकरण असून हा व्हाईट कॉलर गुन्हा आहे . यातील 1 कोटी आणि 60 लाख रुपये संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यात आलेले दिसत आहेत. मग रोख स्वरुपात कीती आले? या पैशातून अलिबागला जमिनी खरेदी करताना रोखीने व्यवहार केल्याचे सदर जमीन मालकांनी सांगितले आहे. त्यामुळे या सगळ्यात शिवसेनेचा थेट सहभाग दिसतोय. खा. संजय राऊत यांचा सहभाग दिसतोय याचा पक्षप्रमुखांनी खुलासा करावा, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केला.

मराठी माणसाचा तथाकथित कैवार घेणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्या. शिवसेनेच्या खासदारांनी हा मराठी माणसांच्या घरांचा जो खून केलाय त्याचे उत्तर द्या, भाजपा अशा अनेक बाबी भविष्यात उघड करेल त्यातील एक पत्रा चाळ हे एक मोठे प्रकरण आहे.

या प्रकरणात संजय राऊत यांचा संबंध कसा हे सांगताना आमदार आशिष शेलार यांनी पत्राचाळीतील रहिवाशांच्या झालेल्या फसवणूकीची सविस्तर माहिती दिली. गोरेगाव येथील 48 एकर म्हाडाच्या जागेवर असणाऱ्या पत्रा चाळीतील 672 मराठी कुटुंबांची घरे पुनर्विकासासाठी ठक्कर या विकासकाला देण्यात आली. त्यानंतर हा प्रस्ताव ठक्कर या कंपनीकडून प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष या कंपनीने घेतला.  मात्र 2022 उजाडले तरी घरे मिळाली नाहीत. या गुरु आशिष कंपनीत प्रवीण राऊत, राकेश आणि सारंग वाधवान हे संचालक असून 45 कोटी रुपयांत पुनर्विकास करु असे सांगून ठक्कर यांच्या कडुन हे काम या कंपनीने सन 2007- 08 च्या दरम्यान घेतले. त्यामुळे यातील प्रोत्साहन FSI आणि विक्रीचा FSI  या गुरु आशिषने खाजगी लोकांना विकला जे पुर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यातून 1 हजार 39 कोटी रुपये मिळवले. ट्रायपार्टी एग्रीमेंट करुन यामध्ये सरकारची फसवणूक केली व हा पैसा वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून आपल्या खात्यावर वळता केला.

इथेच संजय राऊत यांची एन्ट्री झाली, रहिवाशांना घरी खाली करण्यासाठी, परवानग्या मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा उपयोग करुन साम, दाम, दंडभेद करुन संजय राऊत यांनी मराठी माणसांची फसवणूक केली. ते या सगळ्या मराठी कुटुंबांंच्या घरांच्या स्वप्नांचा खुन करणारे गुन्हेगार आहेत. याच काळात खात्यात प्रवीण राऊत यांच्या खात्यावरुन आल्याचे दिसत आहे. सन 2010-11, आणि 2011-12  ला वर्षा राऊत यांच्या खात्यावर  1 कोटी 60 लाख पैसे आले तर रोख रक्कम किती आली याचा शोध ईडी घेते आहे. हे पैसे का दिले प्रवीण राऊत यांनी? याच काळात संजय राऊत यांनी दादर आणि भांडूपला घर, अलिबागला मालमत्ता खरेदी कशी केली? हा पैसा कुठून आला?

या प्रकरणी म्हाडाने  13 मार्च 2018 ला.गुन्हा दाखल केला, त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे प्रकरण गेले त्यावर चौकशी झाली नाही. म्हणून तीन वर्षानंतर हे प्रकरण ईडी कडे गेले. त्यामुळे ही कारवाई सुडबुद्धीची नाही..आज गमच्छे उडवून दाखवताय पण 672 मराठी माणसांच्या घरांच्या स्वप्नांचा खुन कोणी केला?  उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदाराचे हात भ्रष्टाचारात माखलेले आहेत त्याचे शिवसेनेने उत्तर द्यावे, असे आशिष शेलार म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *