Ads

-

मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी व गुजरातींचे योगदान!

By Xtralarge News

July 30, 2022 5:25 pm

Ads

मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी व गुजरातींचे योगदान!

मुंबई दि. ३० जुलै :

मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी व गुजराती समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे. गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत, असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यंनी केले आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जे.पी. रोड, अंधेरी मुंबई येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

आपल्या भाषणात राज्यपालांनी राजस्थानी समाजाच्या दातृत्वाचे कौतुक केले. राजस्थानी मारवाडी समाजाने व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालये, इस्पितळे बांधली व गोरगरिबांची सेवा केली.  राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच नेपाळ, मॉरिशस आदी देशांमध्ये देखील आहे असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तेथे तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो असे राज्यपालांनी सांगितले.

ते म्हणाले की “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”

भारत देश हा शूरवीरांच्या बलिदानामुळे तसेच दानशूर लोकांच्या दातृत्वामुळे मोठा आहे असे सांगताना त्याग, बलिदान व सेवा यामुळेच जनतेचे प्रेम मिळते आणि म्हणून सर्वांनी समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

No comments to show.

Leave a Comment