महाराष्ट्र का ‘घी’ देखा, कोल्हापूर का ‘जोडा’ नही देखा !
महाराष्ट्र का ‘घी’ देखा, कोल्हापूर का ‘जोडा’ नही देखा !
मुंबई, दि. ३० जुलै;
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती व राजस्थानी लोक निघून गेले तर मुंबईत पैसा राहणार नाही असे वक्तव्य केल्याने तीव्र राजकीय पडसाद उमटले आहेत. राज्यपाल यांच्या वक्तव्याचा सर्वच राजकीय पक्षाने निषेध करून माफी मागावी अशी मागणी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाचा खरपूर समाचार घेत, महाराष्ट्राचे मीठ खावून आग कशी लावता, त्यांना कोल्हापूरी जोडा दाखवण्याची वेळ आली आहे या शब्दात सुनावले आहे.
माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यपालपद मानाचे आहे, त्या खुर्चीत बसणाऱ्या व्यक्तीने त्याचा आदर ठेवलेला नाही. मी मुख्यमंत्री असतांना लॉकडाऊन काळात राज्यपालांनी सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे उघडण्याचा आग्रह धरला होता. मागे सावित्रीबाई फुलेंबाबत हिणकस वक्तव्य केले. आता पुन्हा आपत्तीजनक वक्तव्य. राज्यपालांनी महाराष्ट्रात अनेक चांगल्या गोष्टी बघितल्या असतील. महाराष्ट्रात खूप काही बघण्यासारखे. कोश्यारींनी महाराष्ट्रात “महाराष्ट्र का घी देखा लेकिन कोल्हापूर का जोडा नही देखा” असे म्हणायची वेळ आली आहे. त्यांना कोल्हापूरच्या वहाणा दाखवणे गरजेचे आहे. त्याचा उपयोग कसा करायचा हे ठरवावे लागेल.
राज्यपाल काही ठिकाणी तत्परता दाखवतात पण राज्यपालनियुक्त सदस्यांबाबतचा त्यांचा आपल्याला अनुभव काय आला ते पाहिले आहे. आज मात्र त्यांनी कहर केला, महाराष्ट्राची ओळख जगाला आहे पण राज्यपालांना नाही याची खंत वाटते. मुंबई ही हक्काने मिळवली आहे, कोश्यारींनी आंदण दिलेली नाही. परदेशी पत्रकारानी लिहिले आहे १०५ नव्हे तर २००-२५० लोकांनी बलिदान दिले आहे.
राज्यपाल राष्ट्रपतींचे दूत असतात, शपथ घेतांना जाती पाती एकत्र ठेवायची शपथ. राज्यपालांनी हिंदूमध्ये फुट जाती-पाती, धर्मावरुन आग लावण्याचे काम करु नये. त्यांना घरी पाठवायचे का तुरुंगात….अमराठी लोक चिडलेले आहेत. गुण्यागोविदाने नांदणारी लोकं त्यांच्यात फुट पाडत आहेत. गेली तीन वर्ष महाराष्ट्राचे मीठ खाल्ले त्याच्याशी नमक हरामी केली. नवहिंदूंनी राज्यपालांच्या बाबतीत विचारणा करायला हवी. पण आता या राज्यपालांना तात्काळ परत पाठवावे लागेल. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी. आग लावू नये राज्यपाल पदाची शान घालवली. मला अनादर करायचा नाही. हे त्यांच्या ओठातून आलय का पोटातून आलंय हा संशोधनाचा विषय आहे. दिल्लीत बसणाऱ्यांचा जीव मुंबईत असतो हे राज्यपालांनी आपल्या विधानातून स्पष्ट केले आहे. येणाऱ्या काळात निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण करण्याचा या विधानाचा हेतू दिसतो. आमच्याकडे सोबत अमराठी आहेत. त्यांचे संस्कार ते पाळतात. पण राज्यपालांनी फुट पाडल्याचा प्रयत्न केला आहे.
