सोलापूर ग्रामीणमधून तब्बल ‘एवढे’ ई-पास मंजूर!
सोलापूर, दि. 14 ऑगस्ट
लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्यांना आपल्या गावी जाण्यासाठी ई पास असावा लागतो.हा पास नसेल तर तुम्हाला प्रवास करता येणार नाही. सोलापूरच्या ग्रामीण भागात अडकून पडलेल्या अशा तब्बल 1 लाख 97 हजार 45 नागरिकांना मागील साडेतीन महिन्यात ई-पास देण्यात आले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मोहिनी चव्हाण यांनी दिली.
आजपर्यंत ग्रामीण भागात दोन लाख 53 हजार 340 अर्जदारांचे अर्ज ऑनलाईन आले होते. 1 लाख 97 हजार 45 अर्जांना मंजुरी दिली असून 54 हजार 573 अर्ज नाकारले आहेत.
ई-पाससाठी पूर्वी चार-पाच दिवस लागत पढ आता तुमची कागदपत्रे वैध असतील तर अवघ्या एका तासात हा पास मिळतो. ई पाससाठी दररोज हजार ते दीड हजार अर्ज येत असून 31 ऑगस्ट 2020 पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे.
ई-पाससाठी असा करा अर्ज ……
ई पाससाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो त्यासाठी www.covid19.mhpolice.in या वेबसाईटवरून अर्ज करावा. संबंधित व्यक्तीला प्रवासाचे कारण, प्रवास कोठून कुठे करणार, प्रवासाची व परतीची तारीख, सहप्रवासी संख्या, नावे, वाहन क्रमांक आदी माहिती भरावी लागते. याशिवाय अर्जदाराचे छायाचित्र, कशासाठी पाहिजे त्याचा पुरावा, ओळखपत्र किंवा कोविड-19 ची लक्षणे नसल्याचा वैद्यकीय दाखला जोडावा लागतो. परिपूर्ण अर्जाला तत्काळ परवानगी देऊन ई-पास ऑनलाईन उपलब्ध करून दिला जातो.
कसे चालते कामकाज…..
हे कार्यालय संपूर्ण आठवडाभर सुरू आहे. एका उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार, अव्वल कारकून, मंडल अधिकारी, लिपीक, संगणक चालक व इतर कर्मचारी कामकाज पाहतात. दोन कर्मचारी हे दूरध्वनी (0217-2731007) आणि समक्ष नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. आलेल्या ऑनलाईन अर्जावर प्रक्रिया करून योग्य कारणे असतील, सर्व पुरावे जोडले असतील तर तत्काळ परवानगी दिली जाते.आता इतर जिल्ह्याचा ना हरकत परवाना लागत नसल्याने कामाची गती वाढली आहे.
तातडीसाठी केव्हाही उपलब्ध…..
काहीवेळा तातडीचे वैद्यकीय कारण असते किंवा जवळच्या नातेवाईकाचे निधन होते.अशावेळी तत्काळ समन्वय साधून विशेष बाब म्हणून ई-पासची परवानगी दिली जाते.
