20200814_140002
वरिष्ठ पत्रकार रफिक मुल्ला यांचा विशेष लेख.
मुंबई, दि. 14 ऑगस्ट

२००४ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ८० वर्षाचे असताना त्यांचे मधले चिरंजीव जयदेव राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्याकाळी ही बातमी आज पार्थची झालीय त्यापेक्षाही प्रचंड मोठी झाली होती..जयदेव यांनी तशा मुलाखती दिल्या..पवार साहेबांकडे विकास दृष्टी आहे वगैरे.. शिवसेनेत काम का करत नाही असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांचे उत्तर होते..”..इथे कुठे जागा आहे..? सगळे भांडताहेत पदासाठी आणि मला बाळासाहेबांपेक्षा राजकारणी म्हणून पवारसाहेब आवडतात..” ही सगळी वक्तव्यं म्हणजे बारुदच.. स्पष्ट भुमिका आणि मांडणीही..! त्यामुळे माध्यमांसाठी मोठा माल- मसाला..!! राजकारणात त्यावेळी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीचा मुख्य सामना सुरु होता..त्यात ही बोनस घटना..राष्ट्रवादीचे सर्व नेते कार्यकर्ते एवढे आनंदात की हा सामना जणू जिंकलाच..!

पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट ठरली-सिल्वर ओकवर.. अर्थातच या भेटीबाबतच्या आलेल्या सर्व बातम्या पवारसाहेबांना माहिती होत्याच..त्यांनी मिश्किलपणे सुरवात केली..”आज लवकर उठावे लागले का..?”  जयदेव म्हणाले, “मी वेगळा आहे ठाकरे कुटुंबात..!” दोघेही हसले आणि पवारसाहेबांनी मुद्याला हात घातला.. वडीलधारे-बाळासाहेबांचे मित्र म्हणून बोलू लागले. वडिलांशी मतभेद असले तरी त्यांना टोकाचा त्रास होईल असे वागणे ठिक नाही..अशा आशयाची समजुत घातली..नाश्ता-चहा घेत बाकी आवडी-निवडीच्या गप्पा झाल्या. जयदेव तिथून निघाले, त्यानंतर हा विषय संपला..त्यांनी ना राष्ट्रवादीत प्रवेश केला ना नंतर इतर कोणत्या पक्षात..आजपर्यंत ते राजकारणात आलेले नाहीत..!!

२००५ मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, त्याआधी बराच काळ उद्धव आणि राजमध्ये रस्सीखेच सुरु होती. बाळासाहेबांसाठी मोठा मानसिक त्रासाचा काळ होता.. शिवसेनाप्रमुख इतके उत्तुंग नेते पण घरातल्या संघर्षाने पार गलबलून गेले होते..त्यावेळीही सगळ्यांना शरद पवार यांचा एकच सल्ला असे- सबुरीने घ्या..घरातलं-दारात नको…! या वयात बाळासाहेबांना त्रास नको..या भावनेशी सहमत असलेल्या राज ठाकरे यांनी तरीही २००५ च्या नोहेंबरमध्ये शिवसेना सोडली..राज्यभर दौरा केला..त्याकाळात इतरांप्रमाणे पवारसाहेबांशीही चर्चा केली..९ मार्च २००६ रोजी नवा पक्षही स्थापन केला..शुभेच्छा म्हणून-साहेबांचा सल्ला तोच होता..कुटुंब सतत राजकारणाचा विषय होता कामा नये.!

२००५ सालीच नारायण राणेंनी शिवसेना सोडली, तेव्हा २००४ च्या निवडणुकीत नंबर वन ठरलेल्या राष्ट्रवादीत जाण्याचा त्यांचा इरादा होता, शिवसेना आता अक्षरशः संपली असे वातावरण होतं..राणें सोबत डझनभर आमदार घेऊन येणार  होते..राणेंचा राज्याच्या राजकारणात तेव्हा प्रचंड दबदबा होता..ते पक्षात आल्यास- मुंबई-कोकणात फार फ़ायदा मिळाले अशी चर्चा होती. राणे राष्ट्रवादीत जाणार हे जवळपास ठरलं होतं पण पुन्हा बाळासाहेबांशी असलेली दोस्ती आडवी आली..काहीशा नाईलाजानेच ते कॉंग्रेसमध्ये सामिल झाले..दोन वर्षापूर्वी आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यानिमीत्ताने याबाबतच्या अनेक घटनांची माहिती समोर आली. राणेंनी चिठ्ठी टाकुन कॉंग्रेस निवडली हे शरद पवार यांनी गंमतीने सांगून विषयावर पडदा कायम ठेवला..कुणाचा युक्तिवाद असेल की मग छगन भुजबळांना कसे घेतले..? तो काळ राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा, पर्यायाने स्पर्धेचा होता..आणि त्याअनुषंगाने भुजबळ प्रकरणाचे संदर्भही वेगळे होते.

तर मुद्दा हा की, त्या प्रचंड राजकीय घडामोडीच्या काळातही पवारसाहेबांनी इतरांच्या कुटुंबातल्या मतभेदाचा राजकारणात फ़ायदा घेण्याचा किवा त्यात तेल ओतण्याचा प्रयत्न केला नाही..ना आपल्या पक्षातल्या इतर नेत्यांना तसे करु दिले..आज मात्र त्यांच्याच कुटुंबात असलेल्या मतभेदाचा पुरेपुर फायदा घेतला जातोय..अर्थात त्यात पवारसाहेबांचेही अपयश आहेच..अजित पवार यांच्या स्वभावाला मुरड घालण्यात अलिकडे ते सातत्याने अपयशी ठरत आहेत..अजित पवार यांनीही कार्यपद्धती आणि स्वभाव यामुळे काकांशी दिर्घकाळ असलेले मतभेद बाजुला ठेवले होते..पण काका आपल्यावर अन्याय करत आहेत, ही अजित पवार यांची भावना अलिकडे बळावली आहे, याचे मुख्य कारण राज्याच्या राजकारणात सुप्रिया सुळे यांचा वाढलेला वावर..त्यातून त्यांनी एकप्रकारे शरद पवार यांच्यावर दबाव टाकुन पार्थला लोकसभा निवडणुकीत उतरवले आणि त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला.

आज शरद पवार एकोणऐशी वयाचे आहेत. भाजपने महा आघाडी सरकारला चारीबाजूंनी प्रचंड ताकदीने घेरले आहे, राजकारणात हे स्वाभाविक आहे.. त्यातून नातूला अडीच घर चालवण्याचा प्रयत्नही केला गेलाय, सुरुवातीलाच अपयश आल्याने, नैराश्यातून तो पक्षविरोधी भुमिका घेतोय हे स्पष्ट आहे..त्यातून शरद पवार त्याला अपरिपक्व म्हणाले..त्यावर प्रचंड बातम्या होणे स्वाभाविक आहे..त्याच्याकडे संयम नसणे ही अपरिपक्वताच आहे..पण घरात जाऊन बोलावी अशी ही गोष्ट पवारसाहेबांनी मध्यमात मांडणे, हे सुद्धा आश्चर्यकारक आहे..पण आता बाण सुटलाय..!

आता इतकं चारी बाजुने राजकारण तापलेलं असताना पुढे काय होणार हा प्रश्न आहे…चाणाक्य म्हणतात..-जो बुद्धीमान है, पर वफादार नही वो किसी काम का नहीं- याअर्थाने पार्थवर नाही तर अजित पवारांवर हे सगळं निस्तरण्याची जवाबदारी आली आहे. त्यांना आपले काका शरद पवार आणि आपल्या पक्षाप्रती वफादारी दाखवावी लागणार आहे…महाआघाडी सरकारचं भवितव्यही त्यांच्या बुद्धी आणि वफादारीवरच अवलंबून आहे…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *