बंडखोर शिवसेना आमदार संतोष बांगर यांचे मुंबईत शक्तिप्रदर्शन
मुंबई, दि. 13 जुलै :
बंडखोर शिवसेना आमदार संतोष बांगर यांना उद्धव ठाकरे यांनी हिंगोली जिल्हा प्रमुख पदावरून हटवल्यानंतर संतोष बांगर यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहापाशी येऊन शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांगर हेच हिंगोली जिल्हा प्रमुख असतील असे जाहीर केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांगर यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना, कोरोना काळात बांगर यांनी स्वतःच्या बँकेतील ठेवी मोडून कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी धावून गेले होते. असा हा आमदार आपल्याला लाभला असल्याचे सांगून त्यांनी बांगर यांचे जाहीर कौतुक केले. त्यांना त्यांच्या जिल्हाप्रमुख पदावरून दूर करणे कुणालाही शक्य नाही असे सांगताना यापुढे लोकांची चांगली कामे बांगर यांच्या हातून घडावी अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच यापूर्वीच्या अडीच वर्षात सर्वसामान्य शिवसैनिकावर जो अन्याय झाला तसा यापुढे एकाही शिवसैनिकावर होऊ देणार नाही असेही यासमयी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार संतोष बांगर शिवसेनेचे प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाठ आणि आमदार बांगर यांचे हजारो समर्थक शिवसैनिक आवर्जून उपस्थित होते.
Leave a Comment