जागतिक पातळीवरील शैक्षणिक उंची गाठण्यासाठी वाटचाल करा.
जागतिक पातळीवरील शैक्षणिक उंची गाठण्यासाठी वाटचाल करा.
मुंबई दि. 9 जुलै :
जागतिक पातळीवरील शैक्षणिक गुणवत्तेचा अभ्यास करून शैक्षणिक उंची गाठण्यासाठी वाटचाल करण्याचा दृढ निश्चय मुंबई विद्यापीठाने केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी येथील ग्रीन टेक्नॉलॉजी सभागृहात नवीन परीक्षा व प्रशासकीय भवन, ज्ञान स्रोत केंद्र (ग्रंथालय इमारत) मुलींचे वसतिगृह आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह या चार इमारतींचे उदघाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपाल म्हणाले की, जागतिक पातळीवर होणारे शैक्षणिक बदल यावर संशोधन करून भारताने वाटचाल करावी.भारतामध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच येथील संस्कृतीचे वेगळेपण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय अनेक देशांनी मान्य केला ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.
विद्यापीठामध्ये कार्य करताना अडचणी आणि तक्रारी याकडे लक्ष न देता विद्यापीठासाठी आपण काय करतोय आणि विद्यापीठ आपल्याला काय देतय याचा आपण विचार करून कार्य केले तर यश नक्कीच मिळेल, असेही राज्यपालांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठामध्ये अनेक नामवंत विद्यार्थी तयार झाले आहेत. अनेक नामवंत विद्यार्थी नोबेल पुरस्कारापर्यत पोहोचले पाहिजे त्यांचा सन्मान झाला पाहिजे यासाठी सर्वांनी कार्य करावे, असेही कोश्यारी यांनी सांगितले.
