SEna UT

उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का !

मुंबई, दि. ४ जुलै:

शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यामागे शुक्लकाष्ट लागले असून एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच अजय चौधरी यांची गटनेता म्हणून केलेली मान्यताही रद्द करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेता तर भरत गोगावले हे प्रतोद असतील असे विधीमंडळाने स्पष्ट केले आहे.

शिवसेनेच्या वतीने अजय चौधरी यांना गटनेता म्हणून नियुक्त करण्यात आले होती ती रद्द करण्यात आली असून सुनिल प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्तीही रद्द करण्यात आली आहे असे पत्र विधानमंडळ सचिवाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांना पाठविले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ जून रोजी एकनाथ शिंदे यांचे गटनेतेपद काढून घेत अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. शिवसेनेने त्यांच्या सर्व आमदारांना पक्षाच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या सहीने दिले होते. एकनाथ शिंदे यांनी सुनील प्रभू यांची नोटीस कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचे म्हटले होते. मात्र, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रतोद नियुक्तीचा अधिकार हा पक्षप्रमुखांना असल्याचे म्हटले होते.

शिवसेनेतील मोठी बंडखोरी त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभव व आता गटनेता पदही गेल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले असून त्यावरील सुनावणी ११ जुलै रोजी होत आहे. या लढाईत तरी उद्धव ठाकरेंना यश येते का पहाणे महत्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *