… आता ‘त्या’ ३९ आमदारांचे काय होणार ?
… आता ‘त्या’ ३९ आमदारांचे काय होणार ?
मुंबई, दि. ३ जुलै :
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाने बजावलेला व्हिप झुगारून एकनाथ शिंदे गटाच्या ३९ जणांनी मतदान केले. या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी व्हिप बजावला होता. तसेच १६ जणांच्या अपात्रतेचे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. यावर ११ जुलैला सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी उपाध्यक्ष नरहरी झरवळ यांना पत्र लिहून पक्षाच्या आदेशाविरोधात ३९ आमदारांनी मतदान केले असून त्याची नोंद घ्यावी अशी विनंती केली. उपाध्यक्षांनी हे पत्र रेकॉर्डवर आणले. तर, दुसऱ्या बाजूला विधानसभेचे नवीन अध्यक्ष राहुल नावर्केर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरील भाषणानंतर एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आले. गोगावले यांनी पक्षाच्या १६ आमदारांनी पक्षाच्या आदेशाविरोधात मतदान केले असल्याचे पत्रात म्हटले. या पत्राची विधानसभा अध्यक्षांकडून नोंद घेण्यात आली.
उद्धव ठाकरे गटाचे पक्ष प्रतोद सुनिल प्रभू यावर म्हणाले की, व्हिप झुगारून ३९ आमदारांनी केलेले मतदान म्हणजे लोकशाहीची पायमल्ली आहे. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी व्हिप झुगारून मतदान केल्यामुळे राहुल नार्वेकर विधानसभेच्या अध्यक्षपदी किती काळ असाल याबाबत राज्यातील 13 कोटी जनतेला शंका आहे.
विधानसभेच्या अध्यक्षपदी तरुण सदस्याची निवड झाली याचा आनंद वाटत आहे. आपण कधीकाळी शिवसेनेत होता नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. त्यानंतर भाजपात गेला. मागील १५ दिवसांमध्ये सत्तांतराच्या वातावरणात राहुल नार्वेकर कायदा मंत्री होतील असे वाटले होते पण नशिबाचे फेरे कधीही फिरू शकतात. ज्यांना मुख्यमंत्री पाहत होतो त्यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. ज्यांना कायदा मंत्री म्हणून पाहत होतो त्यांना विधानसभा अध्यक्ष व्हावे लागले.
