… म्हणून भाजपाने शिंदे सरकारसाठी पुढाकार घेतला !

0
दादा बाजपा

… म्हणून भाजपाने शिंदे सरकारसाठी पुढाकार घेतला !

मुंबई, १ जुलै :

हिंदुत्वाच्या आधारावर स्थापन झालेल्या भाजपा- शिवसेना युतीला जनतेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत दिले. परंतु शिवसेनेच्या नेतृत्वाने मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी हिंदुत्वाला सोडून अल्पसंख्यांकांचा अनुनय करणाऱ्या पक्षांसोबत आघाडी केली. अडीच वर्षांच्या कारकिर्दीत हिंदुत्व संकटात आले आणि विकासकामे ठप्प झाली. अशा स्थितीत अंतर्गत कलहामुळे आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपाने पर्याय देण्यासाठी पुढाकार घेतला, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

भाजपा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक आमदार असतानाही हिंदुत्वासाठी लढणाऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला. नव्या सरकारने चांगल्या रितीने काम करावे यासाठी पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यांच्या त्यागाचा भाजपाला अभिमान असून त्यांनी कार्यकर्त्यांसमोर पक्षशिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या आमदारांनी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावले. त्यानंतर भाजपाने पर्यायी सरकार देण्यासाठी पुढाकार घेतला. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आणि ध्यास आहे. त्यामुळे हिंदुत्वासाठी लढणारे शिवसैनिक तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांना भाजपाने मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला. भारतीय जनता पार्टीकडे ११३ आमदार असूनही हिंदुत्वासाठी मुख्यमंत्रिपद सोडताना देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखविला व त्याग केला. त्यांच्या त्यागाचा भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना अभिमान आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार राज्याची विकासकामे गतीने पूर्ण करेल आणि सर्वसामान्य माणसाला अभिमान वाटेल असे काम करेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *