गुरुवारी ३० जूनला बहुमत सिद्ध करा..
गुरुवारी ३० जूनला बहुमत सिद्ध करा..
मुंबई, दि. २९ जून :
महाविकास आघाडी सरकारने गुरुवारी बहुमत सिद्ध करावे असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. मंगळवारी संध्याकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन बहुमत सिद्ध करण्यास सांगावे अशी मागणी केल्यानंतर काही वेळातच राजभवनवर तसे पत्र ठाकरे सरकार व विधिमंडळ सचिवास पाठवण्यास आले. राज्यपालांच्या या पत्राने ठाकरे सरकारने आता बहुमताची अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे.
राज्यपालांच्या पत्रात असे म्हटले आहे की, गुरुवारी सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन बोलावून संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी सभागृहात बहुमत सिद्ध करावे. कोणत्याही परिस्थितीत बहुमत चाचणी प्रक्रिया पुढे ढकलता येणार नाही. सभागृह तहकूब करता येणार नाही. काही नेत्यांची चिथावणीखोर वक्तव्य पाहता विधानभवनात आणि विधानभवनाबाहेर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात यावी. आमदारांना त्यांच्या जागेवर उभं राहून शिरगणतीद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पाडावी. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात यावे, असे सुचीत करण्यात आले आहे.
२८ जून २०२२ रोजी ७ अपक्ष आमदारांनी राजभवनाला ई-मेल पाठवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे बहुमत नसल्यानं लवकरात लवकर बहुमत चाचणी घेण्याची मागणी या ई-मेलद्वारे केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी २८ जून २०२२ रोजी माझी भेट घेतली व महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती समजावून सांगत मुख्यमंत्र्यांनी बहुमत गमावल्याचा दावा करण्यात आला. घोडेबाजार टाळण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेण्याची विनंती विरोधी पक्षनेत्यांनीही केली.
शिवसेनेतील ३९ आमदारांच्या घरावर आणि कार्यालयावर होणारे हल्ले पाहता त्यांच्या आणि कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे. माध्यमांतील बातम्या पाहता, मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध करणं अपरिहार्य असून त्यासाठी बहुमत चाचणी घेण्यात यावी. राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून सरकारकडे बहुमत आणि सभागृहाचा विश्वास असल्याची खातरजमा करणं माझं कर्तव्य आहे, म्हणून मी ३० जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे.
