… म्हणून आम्ही आमदार एकनाथ शिंदेंच्या सोबत !
… म्हणून आम्ही आमदार एकनाथ शिंदेंच्या सोबत !
गुवाहाटी, दि. २८ जून :
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाराष्ट्रीतील राजकारण ढवळून काढले आहे. शिवसेनेला हा मोठा धक्का आहे. या राजकीय बंडाळीने राज्यातील ठाकरे सरकार जाणार की राहणार असे चित्र निर्माण झाले आहे. या बंडखोरीवर विविध चर्चा सुरु असताना आपण एकनाथ शिंदे यांच्याबरोबर का आलो हे सांगण्याचा या आमदारांचा प्रयत्न सुरु आहे.

गुवाहाटीच्या रेडीसन ब्ल्यू या पंचतारांकित हॉटेलमध्ये जवळपास ४५-५० आमदार एक आठवड्यापासून मुक्कामी आहेत. आता हे आमदार आपण ही भूमिका का घेतली हे सांगत आहेत.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पाडले हे सांगत आहेत हे आमदार..

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो आहे असे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

असं असलं तरी आजही मी शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये. एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही, गैरसमजाला बळी पडू नका, असे म्हटले आहे..
शिवसेना आमदार तथा मुख्य प्रतोद भरतशेठ गोगावले म्हणतात की, ‘ २०१९ च्या निवडणुकीत पराभूत झालेल्या शिवसेना आमदारांची गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी कधी साधी बैठक तरी घेतली का ? उलटपक्षी राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांना उपमुख्यमंत्री निधी देत होते, ताकद देत होते. एकूणच शिवसेनेचे खच्चीकरण करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात पुढे जात होता. या सर्व कठीण परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी आम्हा सर्व शिवसेना आमदारांना आधार दिला.
आम्हा सर्व आमदारांच्या आग्रहाखातरच एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिक आणि शिवसैनिकांच्या हितासाठी ही भूमिका घेतली आहे.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा मतदारसंघाचे आमदार चिमणराव आबासाहेब पाटील म्हणतात, ‘आम्ही गेली ३० वर्ष प्रथम काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत संघर्ष करत आहोत. काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत आमचा परंपरागत संघर्ष होता आणि यापुढेही राहील. आमच्या मतदारसंघात आमचे प्रमुख विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस, आमच्या पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरुद्धच लढाई आहे. या भूमिकेतूनच आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली की, नैसर्गिक युती व्हावी. पण त्यांच्याकडून दाद न मिळाल्याने आम्ही आमचे नेते एकनाथ शिंदे यांना ही स्पष्ट भूमिका घेण्याचा आग्रह धरला.
नैसर्गिक युती व्हावी ही अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. म्हणूनच या विचारधारेसाठी केलेल्या या बंडाच्या भूमिकेला पक्षातील दोन तृतीयांश पेक्षा अधिक आमदार आणि १० सहयोगी अपक्ष आमदारांचे समर्थन आहे.
दापोलीचे आमदार रमेश कदम म्हणतात की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची मोहीम एकनाथ शिंदे यांनी हाती घेतली आहे याला पाठिंबा देण्यासाठी आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत. रामदास भाईंचा शिवसेना वाढवण्यात सिंहाचा वाटा आहे. माझ्या दापोली मतदारसंघातील मला माझ्याच शिवसेनेचा पालकमंत्री गळचेपी करत होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडलेल्या आमदाराला निधी देत होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तटकरे यांना जिल्हा नियोजन मधून निधी देत होते यासाठी मी हा निर्णय घेतला आहे.
माजी आमदार सुभाष साबणे म्हणतात, उद्धव ठाकरे म्हणतात माझ्या आणि माझ्या कुटूंबाच्या विरोधात बोलणाऱ्या किरीट सोमया यांच्या मांडीला मांडी लावून मी कसं बसू, आणि शिवसेनाप्रमुखाना अटक करून नेणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना, त्यांना घरी जेवायला बोलावताना आपल्याला काहीच वाटत नाही का ? काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक आघाडी करून आधी यवतमाळ जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत देशपांडे यांच्या विरोधात अनिल देशमुख यांच्या मेव्हण्याला उमेदवारी देऊन त्यांचा पराभव करण्यात आला.
पंढरपूरची पोटनिवडणुक लागली त्यातही शिवसेनेची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात अली, देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा तेच करण्यात आलं आणि कोल्हापूर पोटनिवडणुकीत राजेश श्रीरसागर यांच्यासारखा कार्यकर्ता असतानाही ती जागा काँग्रेसला सोडण्यात आली.
एकनाथ शिंदे यांचे हे बंड नसून शिवसेनेच्या भल्यासाठी दिलेला लढा आहे त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांनी भावनिक आवाहनाला न भुलता त्यांच्या लढ्याला जाहीर समर्थन द्यावं.
गुवाहाटीतून एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार दररोज आपले मत मांडत आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत का गेलो हे सांगत आहेत.
