शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदेंनी वेगळी वाट का धरली ?
शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदेंनी वेगळी वाट का धरली ?
मुंबई, दि. 25 जून :
शिवसेना नेते राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या राजकीय बंडामुळे सध्या ते प्रचंड चर्चेत आहेत. एवढी चर्चा तर त्यांची आजवर कधीच झाली नव्हती की पाकिस्तानसह तब्बल ११ देशातील लोकांनी कोण एकनाथ शिंदे म्हणून त्यांचं नाव गुगलवर सर्च करावं. कायम शांत, आपण भले आपलं काम भलं, तोंडाने तसे दुर्बळ त्यामुळे दुसऱ्यावर खरमरित टीका करून इतर बोलघेवड्या नेत्यांसारखे सतत चर्चेत राहतील तर ते एकनाथ शिंदे कसले. तो त्यांचा स्वभावच नाही. असं असलं तरीही त्यांनी स्वपक्षाच्या विरोधात बंड केलं. त्याची राजकीय कारणं ऐकून आपल्या सगळ्यांच्या डोक्याचा चोथा झालाय त्यात मला आता फार पडायचं नाही.

सुरूवातीला त्यांच्या बाजूने असलेलं जनमत गेल्या २ दिवसात वेगाने कलुषित झालं आहे. प्रत्येक मुद्दा भावनिक करून आता त्यांना आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सगळ्याच आमदारांना व्हिलन ठरवायची प्रक्रिया पद्धतशीरपणे सुरू झालेली आहे. लोकांना देखील ३ वेळा आमदार, दोन वेळा मलईदार खात्याचे मंत्री, दोन बंगले, मुलगा खासदार, घडघंच इस्टेट हेच दिसलं, त्यामुळे त्यांनी सहाजिकच आपल्या टीकेचा सूर अधिक तीव्र केला. कुणी शिवसेनेतला गद्दार म्हंटलं, कुणी घरभेदी म्हंटलं, कुणी आमदार किडनॅप करणारा गुंड म्हंटलं, कुणी ईडीला घाबरून भाजपवासी झालेला नेताही म्हंटलं, एका मराठी अभिनेते सुमित राघवन यांनी तर त्यांनी टाकलेल्या ट्विटचा रेफरन्स देत साहेब तुमच्यासाठी महाराष्ट्राचं हित हे चौथ्या क्रमांकावर आहे, असं म्हणत त्यांची जाहीर निर्भत्सना केली. म्हंटलं चला हाच मुद्दा चांगला आहे, याच मुद्दावर सगळ्यात आधी लिहुयात, कारण ज्यांना एकनाथ शिंदे हे काय आहेत तेच माहित नाही अनेक लोकांना, सोशल मीडिया आणि वॉट्सअप युनिव्हर्सिटीवरच्या पोस्ट वाचून मतं मांडणाऱ्यांना आणि टीव्हीवरच्या आणि सोशल मीडियावरच्या चर्चा पाहून मत तयार करणाऱ्यांना सांगुयात तरी की महाराष्ट्र हितासाठी एकनाथ शिंदेची खरंच गरज का आहे ते… आजवर मी त्यांची बाजू मांडणारा किंवा समर्थन दर्शवणारा साधा फोटो देखील गेल्या चार दिवसात माझ्या फेसबुक प्रोफाईलवरून शेअर केलेला नाही. पण आता ती वेळ आलेली आहे.
ठाणे शहरात स्वर्गीय आनंद दिघेंचा हात धरून, त्यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन एकनाथ शिंदे राजकारणात आले. आधी शाखाप्रमुख, मग नगरसेवक झाले त्याच वेळी वैयक्तिक आयुष्यात आलेला दुःखद प्रसंगातून सावरून ते नंतर सभागृह नेता मग ठाणे जिल्हाप्रमुख, नंतर दोन वेळा आमदार आणि मग मंत्री झाले. खरं तर लोकांच्या मदतीला सतत धावून जाणे आणि स्वतःला झोकून देऊन मदत करणे हे गूण साहेबांनी आनंद दिघे यांच्याकडून घेतलेले आहेत. त्यानुसारच त्यांची आजवरची वाटचाल राहिलेली आहे.
केरळमधील जलप्रलय* – २०१८ सालच्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात केरळमध्ये प्रचंड मोठा महापूर आला. राज्यातील सगळ्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या धरणं भरून वाहू लागली. गावंच्या गावं पाण्याखाली गेली. अशावेळी खरं तर जुजबी आर्थिक मदत पाठवून कोणताही राजकीय नेता गप्प बसला असता. मात्र एकनाथ शिंदे यांनी स्वतः तिथे जाऊन लोकांना अन्न, धान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. लोकांना रोगराई होऊ नये म्हणून आरोग्य शिबिरं घेतली. पुरामुळे बेचिराख झालेल्या गावांना पुन्हा वसवण्यासाठी मदत केली. लोकांना वाटलं की एक दोन दिवस राहतील मदत वाटून निघून जातील. पण स्वतः आपल्या लोकांना आणून प्रत्येक घरात मदत वाटून, लोकांना सगळं मिळालं की नाही ते पाहून, त्यांना पुन्हा त्यांच्या पायावर उभं करून ते माघारी परतले. मुंबईहून स्वखर्चाने एवढ्या वस्तू, माणसं, डॉक्टर्स, वैद्यकीय स्टाफ घेऊन मदतीला आलेल्या या माणसाला केरळवासियांनी निघताना मनापासून धन्यवाद दिले.
*सांगली-कोल्हापूर महापूर* – २०१९ सालच्या ऑगस्ट महिन्यात सांगली आणि कोल्हापूरला महापुराचा फटका बसला. दोन्ही शहरं १२ ते १३ फुटापर्यंत पाण्याखाली गेली. बोटीशिवाय लोकांना मदत करता येणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत पाणबुडे, रेस्क्यू टीम आणि आपली मदत पथकं घेऊन ठाण्याहून तातडीने एकनाथ शिंदे कोल्हापूरात दाखल झाले. वरून पावसाचा जोर खाली नजर जावी तिथे पाणीच पाणी.. अशा परिस्थितीत त्यांनी बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. लोकांना अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू, साहित्य लागेल ती मदत केली. गावंच्या गावं सुरक्षित ठिकाणी आणून त्यांना जेवणापासून औषधोपचारापर्यंत सगळी मदत उपलब्ध करून दिली. सलग नऊ दिवस ते दिवसरात्र काम करत होते. नवव्या दिवशी डॉ. श्रीकांत शिंदे जेंव्हा मदत घेऊन कोल्हापुरात पोहोचले, त्या दिवशी सगळ्यांसाठी पहिल्यांदा खिचडीचं जेवण शिजलं. नऊ दिवसांनी साहेब आणि त्यांच्या टीममधील प्रत्येक माणूस जेवला. कोल्हापूर सांगलीत मदतीचे ट्रकच्या ट्रक गेले, वैद्यकीय शिबिरं भरवण्यात आली. लोकांना लागेल ती मदत साहेबांनी केली. एका अडलेल्या बाईला दवाखान्यात नेण्यासाठी तर स्वतःची गाडी देखील देऊ केली. ही मदत करताना किती पैसे खर्च होतायत याची तमाच बाळगली नाही. तीन आठवडे दिवसरात्र मदत करून परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर त्यांनी कोल्हापूर सोडलं. जे त्यांना स्वार्थी, संधीसाधू म्हणतात त्यांच्या बुद्धीची मला खरंच किव करावीशी वाटते, कारण एवढी मदत करूनही याच कोल्हापुरातून २०१९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आठ पैकी सात उमेदवार पडले. पण याबाबत त्यांनी साधं अवाक्षर देखील कधी काढलं नाही.
*महालक्ष्मी एक्सप्रेस पुरात अडकली* – २७ जुलै २०१९ च्या पहाटे पहाटे मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू होता. उल्हासनदीला प्रचंड पूर आला होता. त्यातच मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान पुरात अडकली. गाडीतील प्रवाशांच्या मोबाईलना रेंज नसल्याने बातमी कळायला काहीसा उशीर झाला. मात्र एकनाथ शिंदे यांना जेंव्हा ही बातमी कळली तशी त्यांनी आपली लोकं, एनडीआरएफची टीम घेऊन तातडीने बदलापूर गाठलं. सगळीकडे पाणीच पाणी असताना बोटी उचलून तिथपर्यंत आणल्या आणि स्वतः पाण्यात जाऊन एक्सप्रेसमध्ये शिरून आधी लोकांना धीर दिला. मग सगळ्या १५०० प्रवाशांना बोटीद्वारे हळूहळू बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलवलं. त्यांच्या जेवणाची घरी जाण्याची सोय करून दिली. इतर नेते मदत करताना जिथे नुसत्या ऑर्डरी सोडतात तिथे शिंदे यांनी स्वतः एनडीआरएफच्या जवानांसोबत भर पावसात खांद्याला खांदा लावून लोकांना सुरक्षित स्थळी आणलं. दिवसभर हे मदतकार्य पार पडल्यावर सगळेच जण प्रचंड दमलेले होते. तोच संध्याकाळी एका पत्रकाराला फोन आला की कल्याण मुरबाड रोडवर एका पेट्रोल पंपावर लोकं पुराच्या पाण्यात अडकून पडली आहेत. साहेबांनी फोन केला तेंव्हा समोरची लोकं जीवाच्या आकांताने साहेब तुम्ही काहीही करून आम्हाला येऊन वाचवा तुम्ही आलात तरच आम्ही जीवंत राहू असं म्हणत अक्षरशः रडत होती. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपली बोट पाण्यातून बाहेर काढली. एक रिक्षावाला दिसला त्याला कसंबसं समजावून स्पीड बोट रिक्षावर चढवली. कल्याण-मुरबाड रोडवर नेऊन पुराच्या पाण्यात घातली. काळोखात बॅटरीच्या सहाय्याने हळूहळू वाट काढत काढत त्यांनी या लोकांचा शोध सुरू केला. तासाभरानंतर तो पेट्रोल पंप आणि त्यावर अडकलेल्या लोकं त्यांना दिसली. त्यांनी जवळ जाऊन त्यांना सुखरूप सोडवलं आणि मगच माघारी फिरले. या लोकांनी हात जोडून साहेबांचे आभार मानले.
कोरोनाची पहिली लाट* – कोरोना या आजाराबद्दल सुरूवातीला सारेच अनभिज्ञ होते. त्याचा प्रादुर्भाव चायनामार्गे हळूहळू भारतात शिरला आणि नाही नाही म्हणता लोकं पटापट आजारी पडायला लागली. बेड्स कमी, डॉक्टर्सची कमतरता, नर्सेसची कमतरता, रूग्णवाहिकेची कमतरता त्यात कुणी कुणाला साधी मदत करायला पुढे येईना. लॉकडाऊन लागल्याने संपूर्ण देश बंद अशातही शिंदे दररोज घराबाहेर पडले. बेड्स नव्हते तिथे एमसीएचआई क्रेडाईच्या मदतीने २१ दिवसात ११०० बेड्सचं ग्लोबल कोविड रूग्णालय उभं केलं. डॉक्टर्स नर्सेस नव्हते त्यासाठी एजन्सी शोधून लोकं रूजू केली. रूग्णवाहिका कमी होत्या तिथे २५ टीएमटी बसेसच्या रूग्णवाहिका तयार केल्या. मास्क, सॅनिटायझर, अर्सेनिक अल्बमच्या गोळया, यांचं गल्लोगल्ली झोपडपट्टीत स्वतः जाऊन वाटप केलं. ठाण्यातील सिव्हील रूग्णालयात कोरोनामुळे निम्मा वैद्यकीय स्टाफ आजारी पडला होता. कोरोनाला घाबरून उर्वरित स्टाफने काम बंद केलं. तेंव्हा स्वतः अंगात पीपीई कीट घालून त्यांना तुमच्यावर मी सर्व उपचार विनामुल्य करून तुम्हाला इथून पूर्ण बरं करूनच बाहेर काढेन असा विश्वास त्यांनी दिला. कामगारांनी आंदोलन मागे घेतलं. आणि पुन्हा हॉस्पिटल कार्यान्वित झालं. स्वतःला कोरोना होईपर्यंत दररोज दिवसरात्र लोकांसाठी मदतीसाठी कार्यरत राहिले. पहिली लाट ओसरल्यावरच हे काम थांबलं.
कोरोनाची दुसरी लाट* – कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सुटलो तोच काही दिवसात दुसरी लाट आली. पहिल्या लाटेतली आव्हानं काय कमी होती की दुसरी लाट अजून वेगळी आव्हानं घेऊन समोर आली. रूग्णांची संख्या वेगाने वाढायला लागली. नुसते बेड्स नाही तर व्हेंटीलेटर बेड्सची मागणी वाढली. सोबत जागोजागी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. प्रत्येक डॉक्टर ६ रेमडेसिवीर इंजेक्शन आणा म्हणून पेशंटच्या नातेवाईकाला चिठ्ठी लिहून द्यायला लागला. साहेब सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. रात्री अडीच तीन वाजता हॉस्पिटलमधून फोन यायचे तासाभरात ऑक्सीजन संपेल पेशंटला दुसरीकडे हलवावे लागतील. अशाच अवघड परिस्थितीत ग्लोबल कोविड हॉस्पिटलमधील ४५० रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी नांदेडकडे चाललेला ऑक्सीजन टँकर अडवून रूग्णालयाकडे वळवला आणि अनेकांचे लोकांचे प्राण वाचवले. त्यावर त्यांच्यावर मंत्रीमंडळ बैठकीत देखील टीका झाली पण त्यांनी त्याची तमा बाळगली नाही. ऑक्सिजनचा पेच सोडवण्यासाठी वेगानं पावलं टाकली. संपूर्ण राज्यातला पहिला ऑक्सिजन जनरेशन प्लांट ठाण्यात पार्किंग प्लाझा कोविड केअर रूग्णालयात सुरू केला. त्यानंतर एमएमआर रिजनमध्ये ११ प्लांट कार्यान्वीत केले. ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या लिंडे कंपनीसोबत नियमित पुरवठ्याचे करार केले. त्यांना मुरबाडकडून मुंबईत येण्यासाठी सुरक्षा पुरवली, संपूर्ण भारत बंद असल्याने ऑक्सिजन टँकर चालवणाऱ्या ड्रायव्हर क्लिनरची जेवणाची सोयही स्वतः करून दिली. त्यांच्यासाठी लसीकरणाची खास मोहिम राबवली. पण संपूर्ण एमएमआर रीजनला अखंडीत ऑक्सिजन पुरवठा होईल याची काळजी घेतली. रेमडेसीवीर तर संपूर्ण भारतात ज्या कुणाकडे होते त्या स्टॉकीस्टकडून मिळवले. जिथे एक इंजेक्शन काळया बाजारात ३० हजाराला विकलं जात होतं ते इंजेक्शन एकनाथ शिंदेंनी रूग्णांच्या नातेवाईकांना विनामुल्य उपलब्ध करून दिलं. रूग्णांचे बेड्स एवढे वाढवले की ठाण्यातील रूग्णालयात घाटकोपर भिवंडीपासूनचे पेशंट्स येऊन उपचार घेऊन गेले
महाड-चिपळूणचा महापूर* – गेल्यावर्षी २२-२३ जुलैच्या दरम्यान कोकणात प्रलयंकारी पूर आला. महाड आणि चिपळूण ही नदीकाठावर वसलेली शहरं पुराच्या पाण्याने वेढली गेली. घरात बाजारपेठेत १२ ते १५ फुटांपर्यंत पाणी गेलं. सगळीकडे एकच हलकल्लोळ माजला. गुरूपौर्णिमेचा दिवस असल्याने साहेब उद्धव साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी वर्षावर गेले होते. तिथून थेट साहेबांची टीम महाड चिपळूणकडे निघाली. रात्री दहा वाजता आम्ही दरड कोसळलेल्या तळीये गावाची परिस्थिती पाहिली. दुसऱ्यादिवशी ठाण्यातून आलेल्या टीडीआरएफच्या टीमने एनडीआरएफच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू केलं. गावातील लोकांना जीवनावश्यक साहित्य वाटलं. त्यानंतर कोकणातील महाड, पोलादपूर, चिपळूण, खेड येथील परिस्थिती साहेबांनी स्वतः जाऊन पाहिली. प्रत्येक घरात बाजारपेठेत गुडघाभर चिखल असल्याने साहेब तीन दिवसात मुंबईत परतले. आल्या आल्या सगळ्यात आधी महाड, चिपळूण, सातारा सगळीकडे कपडे, अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू यांचं साहित्य तातडीने रवाना केलं. त्यांनतर दोनच दिवसात ठाणे, नवी मुंबई, पनवेल या महानगरपालिकांचा स्टाफ आणि यंत्रणा घेऊन स्वतः महाड चिपळूणमध्ये दाखल झाले. दोन दिवस गल्लोगल्ली पिंजून काढत स्वच्छता केली. त्यानंतर लोकांना जीवनावश्यक वस्तू वाटून काही गरजूंना आर्थिक मदतही केली. वैद्यकिय शिबिरं आयोजित करून शहरात रोगराई पसरू नये याची दक्षता घेतली. महाडमधील शिवाजी चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि चवदार तळयातील गाळ उपसून त्याचीही स्वच्छता केली. आज साहेबांवर टीका करणारे पक्षाचे सर्वोच्च नेते आणि युवा नेते जेंव्हा कोकणात गेले तेंव्हा त्यांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला. पण एकनाथ शिंदे गल्लोगल्ली फिरले तरीही एकही माणूस त्यांना उटलं उत्तर देऊन बोलला नाही कारण त्यांनाही हे माहित होतं की आपल्याला या संकटातून जर कुणी बाहेर काढू शकेल तर तो एकनाथ शिंदेच..पूरानंतर काही आठवडयाभरात स्वच्छ केलेल्या चिपळूणची पहाणी करायला जेंव्हा शिंदे गेले तेंव्हा लोकांनी जागोजागी थांबून त्यांचे हात जोडून आभार मानले.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष* – राजकीय पक्षाची ताकद मोठी असल्याने लोकांच्या मदतीसाठी त्यांनी वैद्यकीय मदत कक्ष सुरू करावा ही संकल्पना आमचा माध्यमकर्मी मित्र मंगेश चिवटे याने एकनाथ शिंदेंना सांगितली. त्याचा प्रामाणिकपणा आणि तळमळ पाहून साहेबांनी त्यालाच या कक्षाची जबाबदारी द्यायचं ठरवलं. त्यातूनच ठाणे शहरात ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकिय मदत कक्षा’ची स्थापना केली. या कक्षाच्या माध्यमातून रूग्णांना वैद्यकीय मदत मिळवून द्यायला सुरूवात केली. सरकारी योजनांबद्दल, शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी, काही वेळा रूग्णांचं वाढीव बिल कमी करण्यासाठी मदत केली जाऊ लागली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत या मदत कक्षातील वैद्यकिय सहाय्यकांनी अतोनात मेहनत करून हजारो रूग्णांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. आज त्यांच्या माध्यमातून राज्यभरात वैद्यकिय शिबिरं चालतात. नैसर्गिक आपत्ती, राजकीय कार्यक्रम, पंढरपूरच्या आषाढी कार्तिकी वारीसारखे धार्मिक सोहळे यानिमित्ताने हा कक्ष तिथे जाऊन लोकांना सेवा देतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत याच कक्षाने ठाणे जिल्ह्यातील दूर्गम भागात ऑक्सिजन काँन्सन्ट्रेशन मशीन विनामुल्य उपलब्ध करून देऊन अनेक रूग्णांचे प्राण वाचवले. दरवर्षी आनंद दिघे यांच्या जयंतीदिनी हृदयाला छीद्र असलेल्या लहान मुलांवर ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयाच्या वतीने विनामुल्य शस्त्रक्रिया करण्यात येतात. तसेच ठाण्यातील कळवा रूग्णालयात सुरू करण्यात आलेल्या आनंद दिघे हृदयरोग केंद्राच्या माध्यमातून ऍन्जिओग्राफी, ऍन्जिओप्लास्टी, टूडी ईको अशा चाचण्या तसेच बायपास सर्जरी देखील विनामुल्य करण्यात येते. ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी आपल्या मातोश्री गंगुबाई शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू केलेल्या रूग्णालयात १२० वेगवेगळे उपचार आणि शस्त्रक्रिया संपूर्णपणे कॅशलेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आज या वैद्यकीय कक्षाचं काम वटवृक्षाप्रमाणे पसरलं असून राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये ते सुरू आहेत. अभिनेते शरद पौंक्षे यांना कर्करोगाचे निदान झाल्यावर त्यांच्यावर हिंदुजा रूग्णालयात झालेल्या उपचारांवेळी वैद्यकिय मदत कक्षाच्या सहाय्यकांनीच त्यांना लागेल ते सहकार्य केले होते.
साक्षी दाभेकरला मदत– गतवर्षी कोकणात झालेल्या महापुरात पोलादपूर मधील केवनाळे गावातील साक्षी दाभेकर या १३ वर्षांच्या मुलीने दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेवेळी अतुलनीय धाडस दाखवून एका लहान बाळाचे प्राण वाचवले होते. मात्र या दुर्घटनेत तिच्या डाव्या पायावर घराची भिंत कोसळल्याने तिचा पाय कापावा लागला. कबड्डी खो-खो उत्तम खेळणाऱ्या साक्षीला आपला पाय गेल्याने तिचं धावपटू होण्याचं स्वप्न कायमचं विसरावं लागणार होतं. एकनाथ शिंदे यांनी तिची परळच्या केईएम रूग्णालयात जाऊन भेट घेऊन तिच्या उपचारांचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर आधी तिला जयपूर फूट आणि आता दिड लाख खर्च करून अद्ययावत पाय बसवून पुन्हा तिच्या पायावर उभं केलं. साक्षी आणि प्रतिक्षा या दाभेकर भगिनींचं शैक्षणिक पालकत्त्व देखील त्यांनी स्विकारलं. साक्षीला पुन्हा आपल्या पायांवर धावायचं असून ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घ्यायचं तिचं स्वप्न आहे. यासाठी लागेल ती मदत करायची तयारी शिंदे यांनी दाखवली आहे.
आता एवढं रामायण सांगायची गरज काय तर कारण हेच की पब्लिक मेमरी ही शॉर्ट असते. लोकांना झटकन एखाद्याला टॅग लावून टाकायची घाई झालेली असते. आज एकनाथ शिंदे राजकारणात नसले तर काय होईल..? एकनाथ शिंदे नसले तर शिवसेनेत आजच्या तारखेला कार्यरत असलेला सगळ्यात संवेदनशील नेता कायमचा लोकांपासून दूर होईल. किंवा बंडखोर आमदारांचा लढा लढायला उभा राहिला म्हणून कायमचा राजकारणातून बाजूला केला जाईल. तसं ते न होऊ देण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे. लोकांसाठी ते काय आहेत आणि असलेल्या संपत्तीचा वैभवाचा त्यांनी लोकांना मदत करताना कधी विचार केला आहे किंवा नाही ते आम्हाला माहित आहे. कारण मदत केल्याने ज्यांचं आयुष्य बदललं अशांची यादी करायला गेलं तर पुस्तकच लिहावं लागेल. जाता जाता एवढंच सांगतो की ज्यांनी ‘धर्मवीर’ हा सिनेमा पाहिला असेल तर त्या सिनेमात आनंद दिघेंची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकच्या तोंडी एक वाक्य आहे, एकनाथ तुला आता लोकांसाठी जगायचं आहे. अनाथांचा नाथ हो, गरिबांचा हाथ हो, लोकांचा ‘लोकनाथ’ हो…एकनाथ शिंदे हे आपल्या गुरूचं तेच तत्त्व अंगिकारून आजवरची वाटचाल करत आले आहेत. त्यामुळे आपल्यापेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या हिताचा विचार त्यांनी कायम केला आहे आणि यापुढेही करत राहतील. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचं हित खरोखर साधायचं असेल तर त्यांची फार गरज आहे…
लेखक:- पत्रकार विराज मुळे, ठाणे…
