Ads

--

खेलो इंडियामध्ये चौथा दिवसही महाराष्ट्राने गाजवला.

By Xtralarge News

June 6, 2022 11:10 pm

Ads

खेलो इंडियामध्ये चौथा दिवसही महाराष्ट्राने गाजवला.

पंचकुला, हरियाणा ६ जून :
महाराष्ट्राच्या मुलींनी कबड्डीत आपला दबदबा कायम ठेवत तामीळनाडूविरूद्ध झालेला सामना एकतर्फी जिंकून फायनलमध्ये धडक मारली. उपांत्य सामन्यात त्यांनी अवघ्या साडेचार मिनिटांत तामीळनाडूवर लोण चढवले. मुलांचा उत्तर प्रदेशविरूद्ध अटीतटीचा सामना झाला. परंतु अवघ्या चार गुणांनी त्यांना पराभव पत्करावा लागला.

ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये हे सामने सुरू आहेत. स्पर्धेचा चौथा दिवसही महाराष्ट्राने गाजवला. मुलींनी तामीळनाडूवर एकूण चार लोण चढवले. कर्णधार हरजीतसिंग संधू, यशिका पुजारी, मनिषा राठोड आणि अनुजा शिंदे यांनी चढाईत गुणांची अक्षरशः लयलूट केली. उत्कृष्ट पकडी केल्याने तिकडूनही गुण मिळत गेले. पूर्वार्धात (पहिला हाप) १८ विरूद्ध १३ असा गुणफलक होता. उत्तरार्धात (दुसरा हाप) महाराष्ट्राच्या मुलींनी आक्रमण वाढवले. त्यावेळी तामीळनाडूचे खेळाडू बोनस गुणांवर भर देत होते. परंतु ते त्यांना विजयासाठी कामी आले नाही. या सामन्यावर महाराष्ट्राने मजबुत पकड निर्माण केली होती. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या हापमध्ये तीनवेळा तामीळनाडूला ऑलआउट केले.

मुलांच्या कबड्डी संघाचा सामना बलाढ्य उत्तर प्रदेशसोबत झाला. अवघ्या चार गुणांनी हा सामना त्यांनी गमावला. आता त्यांची लढत हरियानाच्या संघासोबत होणार आहे. या सामन्याकडेही क्रीडाप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. दोन्ही संघ विजयाचे दावेदार मानले जातात. सामन्यात पिछाडी भरून काढत महाराष्ट्राने लोण चढवला. मात्र, राजस्थानचे खेळाडू आक्रमक झाले. त्यांनी काही उत्कृष्ट पकडी केल्या. दोन सुपर रेडमुळे सामन्याचा माहोल बदलून गेला. ३० विरूद्ध ३० असा गुणफलक लागलेला असताना उत्तर प्रदेशने केलेल्या चढाया महाराष्ट्राला भारी पडल्या. दुसऱ्या हापमध्येही उत्तर प्रदेशने एक लोण चढवला. परिणामी सामन्याचा नूर पालटला. शेवटी महाराष्ट्राने गुण घेण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. परिणामी ४१ विरूद्ध ३७ अशी चार गुणांनी हार पत्करावी लागली.

महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाच्या गीता कांबळे-साखरे या प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींचा संघ या स्पर्धेत चांगली कामगिरी करीत आहे. गटातील आणि आज उपांत्य सामना जिंकून त्यांनी फायनल गाठली आहे. प्रशिक्षक कांबळे यांचे पती चंद्रकांत कांबळे हे महाराष्ट्राच्या क्रीडा विभागात सहसंचालक आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. तेही महाराष्ट्र संघासोबत हरियानात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा विजय त्यांच्यासाठी बर्थ डे गिफ्ट ठरला. सामन्यानंतर लगेच तो मैदानावर सेलिब्रेट करण्यात आला. हा कौतुकाच्या माहौलचे क्रीडाप्रेमींनी स्वागत केले.

No comments to show.

Leave a Comment