MMRDA भागातील सर्व यंत्रणांनी पावसाळ्यात ‘ठाणे पॅटर्न’ वापरावा.
MMRDA भागातील सर्व यंत्रणांनी पावसाळ्यात ‘ठाणे पॅटर्न’ वापरावा.
मुंबई, दि. 4 जून :
पावसाळ्याच्या काळात आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास ठाण्याच्या धर्तीवर स्थानिक व्यवस्थापन समितीमध्ये स्थानिकांचा सहभाग घेण्यात यावा, त्याचा निश्चितच मदतकार्यात फायदा होणार आहे. मुंबई महानगरपालिकेने एमएमआरडीए, एमएसआरडीसी, जिल्हा प्रशासन, रेल्वे आदी सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवावा. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व यंत्रणांनी पावसाळ्याच्या काळात सतर्क रहावे असे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका- नगरपंचायतींनी केलेल्या तयारीचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी नगरविकास मंत्री म्हणाले की, पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आदी कामे करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः यात लक्ष घालून ही कामे पूर्ण करावीत. पूरजन्य परिस्थितीच्या तयारीचा आढावा आयुक्त व अधिका-यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून घ्यावा. पूरपरिस्थिती हाताळण्याचे नियोजन करताना स्थानिकांचा सहभाग वाढवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेऊन निर्देश दिले असून शहरांमधील नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, नियंत्रण कक्ष आणि अग्निशमन दलाची सज्जता, धोकादायक इमारती, वृक्षछाटणी आदी विषयांवर महानगरपालिका, नगरपालिकांनी तातडीने कार्यवाही करावी. शहरांमधील नाल्यांची १०० टक्के सफाई होईल याकडे विशेष लक्ष पुरवून नालासफाई झालेल्या भागातील गाळ, कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावा.
शहरातील पाणी साचणारी ठिकाणे शोधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देतानाच रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यापूर्वी भरण्याचे निर्देशही मंत्री शिंदे यांनी दिले. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी पूर्वतयारी करुन ठेवण्याबरोबरच शहरातील मोठे होर्डिंग्ज पडून दुर्घटना घडणार नाही त्यासाठी होर्डिंग्जची तपासणी करण्याच्या सूचनाही नगरविकासमंत्री यांनी दिल्या.
पावसाळ्याच्या काळात संकटसमयी शहरांमधील रहिवाशांना तात्काळ मदत पोहोचावी यासाठी सर्व महानगरपालिका, नगरपालिकांनी आपले नियंत्रण कक्ष सज्ज ठेवावेत. जनतेला माहिती देण्यासाठी अलर्ट प्रणाली कार्यन्वित ठेवण्याबरोबरच नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जनतेपर्यंत प्रसारमाध्यमांद्वारे पोहोचविण्याच्या सूचनाही नगरविकासमंत्र्यांनी दिल्या. नियंत्रण कक्षाची सज्जता तपासण्यासाठी मॉकड्रिल घेण्याबरोबरच नियंत्रण कक्षाला आयुक्तांनी अचानक भेटी देऊन पाहणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. साथीचे आजार उद्भवणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, त्याशिवाय औषधांचा पुरेसा साठा करण्यासह आपत्कालिन स्थितीमध्ये रुग्णालये, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाला सज्ज करुन ठेवा.
पावसाळ्यात धरणांचे दरवाजे उघडताना खालच्या गावांची स्थिती पाहून संबंधितांशी संपर्क-समन्वय करुनच निर्णय घ्यावा, दरवाजे उघडल्यानंतर खालच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घेतानाच जलसंपदा विभागाच्या सर्व अभियंत्यांनी या काळात अधिक सतर्क राहावे. नदीकाठ्च्या गावांशी संपर्क तुटल्यास त्या गावांमधील रहिवाशांना अन्नधान्ये, औषधे पुरविण्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे. धबधब्यासारख्या पर्यटन प्रवेश बंदीच्या ठिकाणावर लक्ष ठेवून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सतर्क राहावे लागणार आहे. भूस्खलन किंवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी अधिकची दक्षता घेण्याबरोबरच अग्निशमन दलाने सज्ज राहण्याच्या सूचनाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
