गडचिरोलीत ट्रॉमा केअरसह सुसज्ज मल्टीस्पेशालिटी रुग्णालय

0
१२२४

गडचिरोलीत ट्रॉमा केअरसह सुसज्ज मल्टीस्पेशालिटी रुग्णालय…

मुंबई, दि. २४ मे :

नक्षलग्रस्त व मागास गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारावा यासाठी ट्रॉमा केअरसह सुसज्ज मल्टीस्पेशालिटी रुग्णालय तयार करण्याच्या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिसाद दिला आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी आर्थिक तरतूदीसोबतच तज्ञ स्टाफच्या नेमणुकीसाठी जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे निर्देश दिले उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत.

जलद वाहतुकीसाठी तसेच कोनसरी लोहखनिज प्रकल्पाला मदत आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्ह्यात विमानतळ आणि गडचिरोली -कोनसरी या रेल्वे मार्गाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देशही पवार यांनी दिले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात मंत्रालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात सर्व सोयींनीयुक्त अशा रुग्णालयाची आवश्यकता आहे. लष्कराच्या धर्तीवर दिडशे खाटांचे सामान्य रुग्णालय तयार करावे आणि त्यातील पन्नास खाटा ट्रॉमा केअरसाठी राखीव ठेवाव्यात. या नव्याने तयार होत असलेल्या रुग्णालयात सिटी स्कॅन, एमआरआय यासारख्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून घ्याव्यात. तसेच नेमणूक देतांना डॉक्टरांना विशेष पॅकेज देऊन तज्ञ स्टाफची नेमणूक करण्यासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमुन त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी,पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्यासह इतर तज्ञ लोकांचा समावेश करावा असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळण अधिक गतिमान व्हावे यासाठी जिल्ह्यात सुमारे दोनशे एकर जमिनीवर विमानतळ प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी लागणा-या जमीनीची उपयुक्तता तपासून घेण्यासाठी ही माहिती विमानतळ प्राधिकरणाकडे पाठवावी असे वल्सा नायर यांनी सांगितले. विमानतळ उभारणीसाठी एअरपोर्ट अथॉरिटी कडून शक्यता (फिजीबलीटी) तपासून घेऊन यासाठी लागणारी तांत्रिक पाहणीकरण्यासाठी नागपूर येथून तज्ञ व्यक्ती पाठविण्यात जाईल आणि त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे असे या बैठकीत निश्चित करण्यात आले.

गडचिरोली जिल्हातील गडचिरोली- वडसा- कोनसरी हा   रेल्वे मार्गाच्या उभारणीला 2015 साली मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली होती. मात्र हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी लागणा-या परवानग्या आणि वित्तीय मान्यता मिळणे अद्याप बाकी होते. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास कोनसरी येथील प्रस्तावित लोहखनिज प्रकल्पाला त्याचा फायदा होईल तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध मिळवून देणे शक्य होईल त्यामुळे या प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आले. त्यानुसार या प्रकल्पाबाबत रेल्वेला तात्काळ संमतीपत्र देऊन त्यानंतर सुधारित वित्तीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर आणून तो संमत करून घ्यावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

गडचिरोली ते कोनसरी हा 60 किलोमीटरचा रेल्वेमार्ग तयार होऊन गडचिरोली रेल्वेमार्गाने जोडला गेल्यास हा दुर्गम भाग रेल्वेने जोडला जाईल, तसेच  याभागात अनेक उद्योजक आकर्षित होतील आणि रोजगारास चालना मिळेल, नक्षल भागात रोजगार निर्मिती झाल्यास त्याचा फायदा इथला नक्षलवाद कमी होण्यास होईलच पण त्याचबरोबर शासनाच्या महसुलातही वाढ होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *