कोरोना मृत्यूदर 1% पेक्षा कमी आणण्याचे उदिष्ट !

0
20200811_165327

प्रधानमंत्र्यांनी घेतला १० राज्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा.

मुंबई, दि. ११ ऑगस्ट

देशाच्या एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी ८० टक्के रुग्ण हे १० राज्यांमध्ये आहेत. या दहा राज्यांच्या प्रयत्नातून कोरोनाला हरविलं तर देश जिंकेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला. दरम्यान, महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना बरे झाल्यानंतरही अन्य आजार झाल्याचे निदर्शनास आले असून कोरोनानंतरच्या उपचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
आज प्रधानमंत्री मोदी यांनी महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सितारामन, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार विविध राज्यांचे मुख्य सचिव आदि उपस्थित होते.

मृत्यूदर १ टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट..
दहा राज्यांमध्ये ॲक्टीव्ह केसेसचे प्रमाण ८० टक्के आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढ्यात या राज्यांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले. याराज्यांकडून कोरोना विरुद्ध करण्यात येत असलेल्या उपाययोजनामुळे आणि अनुभवातून कोरोनावर एकत्रितपणे मात करणे शक्य होईल. ही दहा १० राज्ये जिंकली तर देश जिंकेल असे सांगतानाच कोरोनामुळे होणारा मृत्यूदर १ टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दीष्ट असल्याचे मोदी यांनी सांगितले.
एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या ७२ तासांत त्या व्यक्तीच्या निकटसहवासातील व्यक्तींचे सर्वेक्षण चाचण्या केल्या तर संसर्गाचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे सुरूवातीचे ७२ तास महत्वाचे हे लक्षात घेऊनच ट्रेसींग, टेस्टींग वाढवावे असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केले.
यावेळी महाराष्ट्राने केलेली कामगिरी मांडताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, कोरोना बाधित आणि मृत्यू झालेली एकही केस लपवली नाही. पारदर्शीपणे माहिती दिली. कोरोनाबाबत अनेकांच्या मनात भिती तर अनेकांमध्ये काही ही होत नसल्याची लापरवाई आहे तर पोटासाठी बाहेर पडण्याची मजबूरी देखील आहे अशा तीन अवस्थेत कोरोनाचा सामना सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *