हेरवाड व माणगांवप्रमाणे राज्यभर विधवा प्रथाबंद व्हावी :
हेरवाड व माणगांवप्रमाणे राज्यभर विधवा प्रथाबंद व्हावी :
मुंबई, दि. 15 मे :
विधवांना समाजात समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी, विधवा प्रथाबंद व्हावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड व माणगांव ग्रामपंचायतींनी क्रांतीकारी निर्णय घेऊन एक नवा आदर्श घालून दिला आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून महाराष्ट्राने आतापर्यंत देशाला दिशादर्शक असे अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. विधवा प्रथाबंद करणे ही काळाजी गरज असून कोल्हापूर जिल्ह्यातील दोन गावांनी घालून दिलेला आदर्श लक्षात घेऊन राज्य सरकारने जनजागृती करावी आणि विधवा प्रथाबंदी संदर्भात ठोस पावले उचलावीत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
विधवाप्रथा बंद करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुरेशचंद्र राजहंस यांनी पत्र पाठवले असून या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, पतीच्या निधनानंतर आजही महिलांना उपेक्षित आणि भेदभावाचे जीवन जगावे लागत आहे. विधवांना कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक अथवा इतर कार्यक्रमात अपशकुन मानून त्यांना यामध्ये सहभागी होण्यापासून जाणीवपूर्वक डावलले जाते, दूर ठेवले जाते. महिलांचे खच्चीकरण करणाऱ्या वाईट प्रथांविरोधात अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले आहेत. ४ डिसेंबर १८२९ रोजी सती प्रतिबांधात्मक कायदा करण्यात आला. या कायद्यामुळे सतीप्रथा जरी बंद झाली असली तरी दुर्दैवाने समाजाचा विधवांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र असामाजिक, अमानवी व हीन प्रवृतीचा आहे. पतीच्या निधनानंतर आजही पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, कपाळावरील कुंकू पुसणे, पायातील जोडव्या काढणे, हातातील बांगड्या फोडण्याचे दुष्कृत्य रूढी परंपरेच्या नावाखाली केले जाते, हे सर्व बंद झाले पाहिजे. विधवांना समाजात सन्मानाची, समानतेची वागणूक मिळावी, त्यांना इतर महिलांप्रमाणे जीवन जगता यावे यासाठी कोल्हापुर जिल्ह्यातील दोन गावांनी विधवाप्रथा बंद करण्याचा जो क्रांतीकारण निर्णय घेतला आहे त्याची राज्यभर अंमलबजावणी करता यावी यासाठी शासन स्तरावर योग्य तो विचार होऊन त्यादृष्टीने सकारात्मक पाऊल उचलावे असे या पत्रात म्हटले आहे.
