खा. नवनीत राणांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी जातीचा वापर थांबवावा
खा. नवनीत राणांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी जातीचा वापर थांबवावा:
मुंबई, दि. 11 मे :
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सुरु केलेली नौटंकी थांबवावी. मागास जातीची असल्याने कोठडीत अपमानास्पद वागणूक दिली असा कांगावा करून सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न दुर्दैवी आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी मागास जातीची ढाल पुढे करून समाजाला बदनाम करण्याचे काम राणा यांनी थांबवावे, असे आवाहन मातंग समाजाचे नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केले आहे.
यासंदर्भात बोलताना सुरेशचंद्र राजहंस पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरून वातावरण बिघडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्या धर्माचे पुजा-पाठ, प्रार्थना करण्याचा अधिकार संविधानाने सर्वांना दिला आहे पण त्यासाठी दुसऱ्यांना त्रास देण्याची गरज नाही. याप्रकरणी नवनीत राणा यांना अटक केली असता कोठडीत त्यांना मागास जातीची असल्याने पाणी पिण्यास दिले नाही अशी तक्रार लोकसभेच्या अध्यक्षांकडे केली होती आणि आता जामीनावर सुटका होताच पुन्हा लोकसभा अध्यक्षांना भेटून त्यांनी तक्रार केली आहे. नवनीत राणा या महाराष्ट्र पोलीस व महाराष्ट्राची देशात बदनामी करत आहेत. राणा यांनी जातीचा आधार घेऊन स्वतःचे राजकीय हित साधण्याचा प्रयत्न करु नये तसेच त्यांनी दलित समाजाचे नाव खराब करु नये.
खा. नवनीत राणा यांनी मागास जातीचा बनावट दाखला घेऊन फसवणूक केलेली आहे. जातीचा बनावट दाखल बनवून खऱ्या मागासवर्गींची संधी त्यांनी डावलली आहे. तसेच दलित जातींचा त्यांनी अपमानही केला आहे. मा. मुंबई उच्च न्यायालयात राणा यांचा जातीचा दाखल बनावट असल्याचे स्पष्ट झाले असून आता हे प्रकरण मा. सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टात जो निकाल येईल तो येईल पण बनावट जातीचा दाखला बनवून त्याचे फायदे लुटायचे आणि दलित समाजाला बदनाम करणे त्यांनी थांबवावे असे राजहंस म्हणाले.
