अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतःच्या घरात द्या !
अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतःच्या घरात द्या !…
मुंबई, दि. ५ मे:
राज ठाकरे यांच्या भोंगे बंदचे राजकीय पडसाद अजून उमटत आहेत. अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही, अशी हुकुमशाही चालणार नाही, तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतःच्या घरात द्या. कायद्याने जे काही आहे ते आम्ही करणार, असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, अल्टिमेटमची भाषा कुणी करु नये. कायद्याने हे सरकार चालते. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी योग्य त्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. अशा पध्दतीने स्टेटमेंट करणे योग्य नाही. जो काही निर्णय करायचा ठरला तर सर्वांना बंधनकारक आहे. वेगवेगळ्या धर्माला नियम लागू होईल. उत्तर प्रदेशमध्ये जे घडले त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने २००५ मध्ये निर्णय दिला होता त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. राज्यात जी धार्मिक स्थळे आहेत त्यांनी परवानगी घ्यावीच तसेच आवाजाची मर्यादा ओलांडू नये. परवानगी घेतली नसेल तर घ्याव्या. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. ठराविक दिवसात परवानगी घ्यावी. नाही घेतली तर कठोर भूमिका घेतली जाईल. कायदा कुणी हातात घेण्याचा व तसे धाडस कुणी करु नये. न्यायालय जो निर्णय देईल त्याचे पालन करण्याचे सर्वांचे काम आहे असेही अजित पवार म्हणाले.
राज्यात उशिरा दहाच्या पुढे हरिनाम सप्ताह, जागरण, गोंधळ असे कार्यक्रम ग्रामीण भागात सुरू असतात. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचे तंतोतंत पालन करुन सगळ्यांनी सहकार्य करावे. सध्या काही ठिकाणी आवाज कमी झाले आहेत. त्यामुळे आता सर्वांनाच याची अंमलबजावणी करावी लागणार आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले..
