अल्टिमेटम दिला म्हणजे मोगलाई माजली काय?
अल्टिमेटम दिला म्हणजे मोगलाई माजली काय?
मुंबई, दि. २ मे :
महाराष्ट्र हे कायद्याने चालणारे राज्य आहे अल्टीमेटमने नाही. जो कायदा हातात घेईल त्याच्यावर कारवाई होईल. भोंगे काढण्यासंबंधी राज ठाकरेंनी अल्टीमेटम दिला, अल्टिमेटम दिला म्हणजे मोगलाई माजली काय? असली दादागिरी खपवून घेणार नाही. असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
राज ठाकरेंचा समाचार घेत अजित पवार म्हणाले, नियम सर्वांना सारखे आहेत. कुणीही दादागिरी करु शकत नाही. अल्टिमेटम दिला म्हणजे काय मोगलाई लागली आहे काय? नियमाच्या आत आपण एखादी कृती केली तर पोलीस काहीच करणार नाहीत पण कायदा मोडला तर पोलीस नक्की कारवाई करणार. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणासाठी अनेक जण जाणार होते. त्यांची आज अवस्था काय झाली हे त्यांनी एकदा पाहावे. राज्यात जे वातावरण निर्माण झाले आहे ते अत्यंत चुकीचे आहे. जाती जातीत तेढ निर्माण करण्याचे काम काही जणांकडून होत आहे. सरकार जातीय सलोखा राखण्याचे काम करत आहे. पण शांततेचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल.
भोंगे उतरवायचे ठरवले तर शिर्डीच्या मंदिरावरील भोंगादेखील उतरवावा लागेल. तिथे ५ वाजता काकडा आरती सुरु होते. ग्रामीण भागात उशिरापर्यंत हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम चालतात. जागरण गोंधळाचे कार्यक्रम, यात्रा चालतात पण काही जणांना समजून घ्यायचे नाही. फक्त राजकारण करायचे आहे, असे अजित पवार म्हणाले.
