शिवरायांच्या समाधीचा राज ठाकरेंचा ‘तो’ दावा चुकीचा !
शिवरायांच्या समाधीचा राज ठाकरेंचा ‘तो’ दावा चुकीचा !
मुंबई, दि. २ मे :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोधार केला असा दावा केला होता त्यावर अनेक स्तरातून प्रतीक्रिया उमटल्या असून राज ठकरे हे धादांत खोटे बोलत आहेत असे प्रतिवाद केला.
राज ठाकरेंचा दावा खोडून काढत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार 1926 साली ब्रिटिश व शिवाजी स्मारक जीर्णोद्धार समिती ह्या दोघांनी मिळून केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही खरी संभाजी महाराज यांनी बांधून ठेवली होती पण ती नंतर दुर्लक्षित करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि त्याचे पूर्ण बांधकाम याबाबतचे सगळे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यावरून हे सिद्ध होते कि लोकमान्य टिळकांनी समाधी बांधण्यासाठी समिती स्थापन केली होती, पैसेही जमा केले होते पण त्यांनी जीर्णोद्धार केला नाही.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड म्हणतात, “लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जीर्णोद्धारासाठी पैसे जमा केले पण जीर्णोद्धार केला नाही. इंदौरचे होळकर आणि ब्रिटिशांनी १९१७ मध्ये समाधीचा जीर्णोद्धार केला. राज ठाकरे खोटा इतिहास सांगून महाराष्ट्रात वातावरण बिघडवत आहेत. लोकमान्य टिळकांनी ना समाधीचा जीर्णोद्धार केला, ना शोधलेली आहे. महात्मा फुले यांनी सर्वप्रथम समाधी शोधली, त्यांच्यावर पोवाडा लिहिला आणि शिवजयंती सुरू केली.”
छत्रपती शाहू महाराजांनी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिलं स्मारक केले. इंदौरचे होळकर आणि ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने १९१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार केला. लोकमान्य टिळक आणि पुण्यातील काही लोकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी काही पैसे जमा केले होते. परंतू १ ऑगस्ट १९२० ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि तो पैसा तसाच शिल्लक राहिला. त्याचा जीर्णोद्धाराला उपयोग झाला नाही. लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला हा खोटा इतिहास आहे.
हे जेम्स लेनचं मूळ पुस्तक आहे. ते २००३ मध्ये आलं. हे कोर्टात होतं. या पुस्तकाच्या पान नं. ९१ वर जेम्स लेनने शिवाजी महाराजांच्या पितृत्वावरून जो मजकूर लिहिला त्यावरून वाद झाला. तशाच प्रकारचं लिखाण बाबासाहेब पुरंदरेंनी राजा शिवछत्रपती या पुस्तकात पान नं. १२६ वर केलं आहे. येथे त्यांनी बालशिवाजी, जिजाबाई आणि दादाजी कोंडदेव यांचं गोत्र एक आहे असं म्हटलं. ज्या हिंदू धर्मासाठी राज ठाकरे आता रस्त्यावर उतरले आहेत त्या हिंदू धर्मात आई, वडील आणि मुलाचं गोत्र एक असतं, असेही गायकवाड यांनी नमूद केले.
