खा. श्रीकांत शिंदेंकडून साता-याला 2 रुग्णवाहिका!
मंत्री आदित्य ठाकरे वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका भेट..
ठाणे, दि. 10 ऑगस्ट
शिवसेना नेते तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ३० व्या वाढदिवसानिमित्त सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीने राज्यात ३० रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यातील २ सुसज्ज रुग्णवाहिका सातारा जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेकरिता प्रदान करण्यात आल्या.
या दोन्ही रुग्णवाहिका सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळ असलेल्या वाई, पाचगणी, महाबळेश्वर, तापोळा आदी विभागांत कार्यरत राहणार आहेत. गेल्या काही वर्षात या भागात येणाऱ्या पर्यटकांपैकी काही पर्यटकांसोबत हृदयविकाराचा झटका, अपघात आदी दुर्घटना घडल्या होत्या. यात वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने काही पर्यटकांना आपले प्राण देखील गमवावे लागले होते. या पार्श्वभूमीवर सदर दोन्ही रुग्णवाहिका या भागात येणाऱ्या पर्यटकांसाठी आधार ठरणार आहेतच तसेच परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. विशेषतः सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागांतील खेड्या पाड्यात आणि वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन या रुग्णवाहिका सेवा देणार आहेत.
कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या २ सुसज्ज रुग्णवाहिकांच्या चाव्या आणि कागदपत्रे महाबळेश्वर शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, तापोळा येथील सामाजिक कार्यकर्ते अजित सपकाळ, दरे येथील अजित कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख मंगेश चिवटे, वैद्यकीय सहाय्यक निलेश देशमुख उपस्थित होते.
