20 लाख मे. टन कोळसा आयातीसाठी निविदा काढल्या
20 लाख मे. टन कोळसा आयातीसाठी निविदा काढल्या !
मुंबई, दि. 19 एप्रिल:
राज्याला होत असलेला अपुरा कोळसा पुरवठा व उन्हाळ्यामुळे मागणी वाढली असल्याने राज्यात दर दिवशी २ हजार ते २५०० मे.वॅट ची तूट निर्माण झाली होती ती दूर करण्यात सध्या विभाग यशस्वी झाला आहे. 20 लाख मे. टन कोळसा आयात करण्याच्यादृष्टीने निविदा काढल्या आहेत. महावितरणच्या स्तरावर आवश्यकतेनुसार 4 लाख मे. टन कोळसा आयात करण्याचे कार्यादेश दिलेले आहेत. वीज खरेदी करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.
नितीन राऊत पुढे म्हणाले की, राज्यात भारनियमन करावे लागू नये यासाठीचे नियोजन विभागाने केले आहे. नगरविकास, ग्रामविकास विभागाकडील प्रलंबित वीज देयकांच्या थकबाकीची रक्कम विभागाला मिळावी अशी मागणीही डॉ. राऊत यांनी यावेळी केली. त्यांनी राज्यात येणाऱ्या कोळसा रॅकची संख्या कमी झाल्याने वीज निर्मितीमध्ये कमी आल्याचे सांगितले. कोळसा निर्मिती आणि रॅकचे नियोजन याचे उत्तम नियोजन होण्याच्या दृष्टीनेही विभाग प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.
राज्यात भारनियमन करावे लागू नये म्हणून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना यश मिळत असल्याचे व मागील ५ दिवसांपासून राज्यात कोणत्याही प्रकारचे भारनियमन करण्यात आलेले नसल्याची माहिती उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. एकट्या महाराष्ट्रातच नाही तर देशात वीजेची टंचाई आहे. कोळशाचा अपुरा पुरवठा हे त्यामागचे मुख्य कारण असून इतर १२ राज्यातही कोळशामुळे भारनियमन सुरु आहे असे उर्जा मंत्री म्हणाले.
