खाजगी वीज खरेदी करून दलाली लाटण्यासाठी कृत्रिम वीजटंचाईचा घाट

0
Bjp Bhandari

खाजगी वीज खरेदी करून दलाली लाटण्यासाठी कृत्रिम वीजटंचाईचा घाट..

मुंबई, दि. १८ एप्रिल:

राज्यातील कोणतेही वीजनिर्मिती केंद्र कोळशाअभावी बंद नसल्याचे वीज मंडळाच्या तपशिलावरूनच स्पष्ट दिसत आहे. ढिसाळ कारभार व कमाल मागणीच्या वेळी पुरेशी वीजनिर्मिती करण्यातील नियोजनाचा अभाव हीच कारणे राज्यातील वीजटंचाईला कारणीभूत आहेत. खाजगी क्षेत्राकडून महागडी वीज खरेदी करून दलालीतील टक्केवारी कमाईकरिताच हा कृत्रिम वीजटंचाईचा घाट घातला जात आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केला आहे.

पत्रकारांशी बोलताना भांडारी म्हणाले की, केंद्र सरकारने वीजखरेदीच्या दरावर मर्यादा घातल्याने हितसंबंधी यांचा जळफळाट सुरू असून दलालीतील टक्केवारी घटल्यामुळे अधिकाधिक वीज खाजगी स्रोतांकडून खरेदी करण्यासाठी वीजटंचाई भासवून सामान्य जनता, उद्योगक्षेत्र आणि शेतकऱ्यास वेठीला धरले जात आहे. कोळशाअभावी वीज टंचाई झाल्याचे कारण देणाऱ्या सरकारने तफावतीची टक्केवारी जाहीर करावी.

अगोदर विजेअभावी शेतकऱ्याचे प्राण कंठाशी आणायचे, मग कर्जबाजारी होणे भाग पाडायचे आणि कर्जमाफीची कोरडी सहानुभूती दाखवत त्याच्या भावनांशी खेळत राजकारण करायचे असा हा हीन डाव आता जनतेच्या लक्षात आला आहे. ऐन उन्हाळ्यात विजेची समस्या निर्माण करून जनतेच्या भावनांशी खेळ सुरू केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा उद्रेक होईल व त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल.

कोळसा टंचाई असल्याचे भासवत केंद्र सरकारकडे बोटे दाखविण्याचा प्रकार म्हणजे आपल्या नियोजनशून्य कारभारावर पांघरुण घालण्याचा जुनाच केविलवाणा प्रयत्न आहे. मार्चपासून जूनअखेरपर्यंत विजेची मागणी वाढते हे स्पष्ट असतानाही औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांकरिता कोळसाचा पुरेसा साठा करण्याकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. कोळशाची कृत्रिम टंचाई भासवून खाजगी क्षेत्राकडून चढ्या भावाने कोळसा खरेदी करीत खाजगी क्षेत्राचे हितसंबंध जपण्याकरिता गरीब ग्राहकांच्या खिशात हात घालून सरकारनेच समस्याग्रस्त जनतेवर वीजटंचाईचे संकट लादले आहे. शेतकऱ्यांना वेठीस धरण्यासाठी राज्यातील सुमारे दोन हजार मेगावॅट क्षमतेची वीजनिर्मिती केंद्रे बंद ठेवण्यात आली असा थेट आरोपही त्यांनी केला. कमी मागणीच्या काळात वीजनिर्मिती केंद्रांची देखभाल दुरुस्ती करणे शक्य असताना, आज कमाल मागणीच्या काळातच अनेक वीजनिर्मिती संयत्रे बंद ठेवण्यात आली आहेत. यावरूनच वीजटंचाई निर्माण करून जनतेस वेठीस धरण्याचा कट स्पष्ट होतो, असे भांडारी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *