नाशिकची सकाळ व रात्र भोंग्याने व्हायची आता मात्र वेगळेच भोंगे वाजतात !
नाशिकची सकाळ व रात्र भोंग्याने व्हायची आता मात्र वेगळेच भोंगे वाजतात !
नाशिक, दि. 17 एप्रिल :
नाशिकची मुख्य ओळख ही गोदावरी असून ती अतिशय स्वच्छ राहिली पाहिजे. नदीचे नदीपन आपण जपलं पाहिजे, ती गटार होता कामा नये याची दखल सर्वांनी घ्यावी. नाशिक शहर स्मार्ट करायचे असेल तर गोदावरी स्वच्छ झाल्याशिवाय ती स्मार्ट होणार नाही. जेव्हा गोदावरी नदीला जोडणारी गटारं बंद होतील तेव्हाच नाशिकचं नाशिकपण मिळेल असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
नाशिकच्या परशुराम सायखेडा नाट्यगृह येथे जैन सेवा कार्य समिती, नाशिक यांच्यावतीने भगवान महावीर जन्म कल्याण सोहळ्या निमित्ताने आयोजित वाख्यान मालेत मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक काल आज आणि उद्या या विषयावर संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
भुजबळ म्हणाले की, नाशिक हे सकाळी भोंग्याच्या आवाजाने सुरू व्हायचं आणि रात्री पुन्हा भोंगा व्हायचा मात्र आता वेगळेच भोंगे वाजविले जात आहेत अशी मिश्किल टिपणी त्यांनी केली. सद्या वैचारिक भ्रष्टाचार अधिक वाढला असून सत्ता हवी म्हणून कुठलेही मार्ग अवलंबिण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. यातून काही साध्य होईल असे वाटत नाही कारण एकाच धर्माची राष्ट्र एकमेकांमध्ये भांडत आहे. जगात सध्या सगळीकडे हिंसा सुरू आहे. भगवान महावीर यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. भगवान महावीर यांची शिकवण कठीण असली तरी ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.
पूर्वी गोदावरी नदी अतिशय स्वच्छ वाहत होती. लोक स्नान करत होते, पाणी पीत होते, जगभरातील लोक याठिकाणी बघण्यासाठी येत होते. मात्र सद्याची परिस्थिती बदलली असून गोदावरी अतिशय प्रदूषित झाली आहे. त्यामुळे भाविकांना या नदीत स्नान करणे देखील अवघड झाले आहे. नाशिकची ओळख मंत्रभूमी अशी होती आता ती ओळख तंत्रभूमी आणि यंत्रभूमी देखील बनली आहे. शहरांचा विकास होत असताना सर्व प्रकारचे प्रदूषण वाढत आहे. हा चिंतेचा विषय आहे. विज्ञान जसे पुढे जाईल तश्या नवीन गोष्टी पुढे येतील त्याला आपला विरोध नाही. मात्र त्याचा वापर करतांना आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
२००४ साली येवल्यातून निवडून आल्यानंतर मुंबई पुण्याच्या धर्तीवर नाशिकचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले. सर्व प्रथम मुंबई नाशिक रस्त्यांचे काम हाती घेतलं. त्यानंतर जिल्ह्यात रस्त्याचे जाळ निर्माण करत नाशिक शहरात भव्य असा उड्डाणपूल निर्माण केला. या शहराला जोडण्यासाठी आतील आणि बाहेरील रिंग रोडचे जाळ निर्माण करत वाहतुकीचा प्रश्न सोडविला. त्र्यंबकेश्वर नाशिकला जोडणारा हिरवा चौपदरी रस्ता विकसित केला आज याठिकाणी उच्च दर्जाचे हॉटेलस निर्माण झाल्या असून जगभरातील पर्यटक याठिकाणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिकचं हवामान अतिशय सुंदर असून नाशिक शहराचा औद्योगिक विकास करतांना धूर ओकणारे कारखाने नको, यासाठी प्रयत्न केले. शहर व जिल्ह्याला धार्मिक महत्व असून धार्मिक पर्यटनाच्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. देशात एकमेव अशी फर्निक्युलर ट्रॉली सप्तश्रृंगी गडावर निर्माण केली. शहर व जिल्ह्यात धार्मिक पर्यटनासोबत इटर पर्यटन व्हावं यासाठी बोट क्लब, साहसी क्रीडा संकुल, ग्रेप पार्क रिसॉर्टची निर्मिती केली. त्यामुळे शहर व जिल्ह्यात अधिक पर्यटन वाढलं आहे. पर्यटन वाढल्याने अर्थकारणाला गती मिळालेली आहे.नाशिकमध्ये सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी आपण पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करत आहोत. कोरोनाच्या काळात ऑक्सिजनची कमतरता झाल्याने हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट बसविण्यात आले. त्यामुळे नाशिक आज ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण बनले असल्याचे त्यांनी सांगितले.
