नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्स नेमा

0
Mumbai Dranage

नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्स नेमा…

मुंबई दि. १५ एप्रिल :

मुंबईतील नालेसफाईची कामे दरवर्षी पेक्षा १५ दिवस उशिराने सुरु होत असून भाजपने दौरा केला त्यावेळी अत्यंत भयावह चित्र समोर आले आहे. १० % पेक्षा जास्त काम झालेले नाही. आता खूप कमी वेळ शिल्लक असल्याने पारदर्शी पद्धतीने नालेसफाईची कामे पूर्ण व्हायची असतील तर कामावर लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची विशेष टास्क फोर्स नियुक्त करा, अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने केली.

भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबईतील नालेसफाईची पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान जे भयावह चित्र समोर आले. त्याचा सचित्र अहवाल पालिका आयुक्तांना सादर करून त्यांच्याशी चर्चाही केली.

आशिष शेलार म्हणाले की,  मुंबई धोक्याच्या वळणावर असून सत्ताधारी फरार व प्रशासन हाताची घडी घालून बसले आहे. “पूर्व उपनगराचे” तर “पूर उपनगर” होईल कि काय अशी भीती वाटते. भांडूप येथील एपीआय नाल्यामध्ये कल्वर्टचे काम अर्धवट असून ते पूर्ण झाले नाही तर रेल्वे ट्रॅकवर पाणी घुसेलच शिवाय भांडूप परिसर जलमय होईल. बॉम्बे ऑक्सिजन नाल्यामध्ये उभारलेल्या तटरक्षक भिंतीमुळे प्रवाह अडला आहे. बहुतांश ठिकाणी कामांना सुरुवात झालेली नाही.

गाळ कुठे टाकणार त्यावर लक्ष कोण ठेवणार ? त्याचे वजन कसे करणार ? असे प्रश्न प्रशासनाला विचारले असता अतिरिक्त आयुक्तांनी अकलेचे तारे तोडून गाळ घेऊन जाणाऱ्या गाड्यांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात येणार असल्याचे सांगितले हि सिस्टीम तर दरवर्षीच असते तरीही भ्रष्टाचार होतो. त्यामुळे आता आय.ए.एस. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात मैदानात उतरावे, मुंबईकरांची सेवा करावी, कामांवर लक्ष ठेवावे आणि गाळाच्या गाड्यांसोबत आय.ए.एस. अधिकाऱ्यांच्या गाड्यांना सुद्धा जी.पी.एस. बसवा अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी नालेसफाईचा परिमाण ५० % ने कमी असून नालेसफाई दिड महिना उशिरा सुरु झाली आहे. पण कंत्राट रक्कमेत ३२ कोटींची वाढ हे गौडबंगाल काय आहे ? नालेसफाई करताना मुंबईच्या नाल्यातून २०२० साली ३ लाख ५६ हजार क्युबिक मीटर गाळ काढला होता. गतवर्षी २०२१ साली ४ लाख ३६ हजार क्युबिक मीटर गाळ काढला होता. यावर्षी मात्र केवळ २ लाख ५२ हजार क्युबिक मीटर म्हणजे ५० टक्के गाळ काढण्याचे कंत्राट दिलेले आहे ! असे शेलार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *