‘ काय, कसे काय तुम्ही बरे आहात ना ?’

0
IMG-20220413-WA0049

‘ काय, कसे काय तुम्ही बरे आहात ना ?’

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संवाद.

मुंबई, दि 14 एप्रिल:
गतिमान कार्यभार करतांना अधिकाधिक पेपरलेस काम आणि तंत्रज्ञानाचा उपयोग कसा वाढेल ते पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातल्या काही विभागांना स्वतः भेटी दिल्या तसेच कर्मचाऱ्यांशी चर्चा करून ई टपाल, पेपरलेस कामकाज प्रणाली विषयी सूचना केल्या व अडचणी विचारल्या. यावेळी कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करतांना एका दिव्यांग कर्मचाऱ्याची त्यांच्यासमवेत छायाचित्र घेण्याची  इच्छाही पूर्ण केली आणि त्याची विचारपूसही केली.

थेट विभागांना भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांशी बोलणारे मुख्यमंत्री विरळाच अशी प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केली. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना फुलं वाहून अभिवादन केले. यावेळी पुराभिलेख संचालनालय यांच्यातर्फे मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक सुंदर प्रदर्शन लावण्यात येत आहे, त्यांच्या तयारीची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. हे प्रदर्शन कायमस्वरूपी इंदू मिल येथील स्मारकस्थळी पण लावा अशी सूचना करून मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शनातील बाबासाहेबांचा दस्तावेज तसेच पत्रं, जुनी छायाचित्रे यांची उत्सुकतेने पाहणी केली.


त्रिमूर्ती प्रांगणातील प्रदर्शनाची तयारी पाहून मुख्यमंत्री प्रथम मंत्रालयातील विस्तारित इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचाऱ्यांना भेटले. त्याठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त केलेल्या सजावटीचे त्यांनी कौतुक केले तसेच बाबासाहेबांच्या प्रतिमेचेही पूजन केले. कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांच्या कमाविषयीही त्यांनी माहिती घेतली.

यानंतर मुख्यमंत्री महसूल विभाग तसेच सामान्य प्रशासन विभाग, गृह विभाग, विधी व न्याय अशा विभागात प्रत्यक्ष आतमधून फिरले. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. मुख्य सचिवांनी मंत्रालयात ६ एप्रिलपासून फाईल्स आणि कागदपत्रे यांचे संगणकीकरण तसेच स्वच्छता, अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट याची मोहीम सुरु असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी देखील पेपरलेस कामांवर भर देताना तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त उपयोग करावा अशा सूचनाही केल्या. मुख्यमंत्र्यांनी संकल्प कक्ष तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील कक्षांना देखील भेट देऊन पाहणी केली व कामकाजाविषयी महत्वपूर्ण सूचना केल्या.

मंत्रालयातील कर्मचाऱयांनीही आपल्या भेटीस आलेल्या मुख्यमंत्र्यांची तब्येतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या आपलेपणामुळे व प्रत्यक्ष कामकाजाविषयी केलेल्या सुचनांमुळे उत्साह दुणावल्याची प्रतिक्रीया कर्मचा-यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *