Ads

--

शरद पवार ‘असल्या’ गोष्टींना पुरून उरतील !

By Xtralarge News

April 12, 2022 9:37 am

Ads

शरद पवार ‘असल्या’ गोष्टींना पुरून उरतील !

कर्जत, दि. 12 एप्रिल :
विरोधक ऐनकेन प्रयत्न करून महाविकास आघाडी सरकार पाडू पाहत आहे मात्र त्यांना ते शक्य होत नाही. सरकार पडत नाही म्हणून आता इतर माध्यमातून त्रास दिला जात आहे. शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केली गेली. मात्र पवारसाहेब असल्या गोष्टींना पुरून उरतील अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने कर्जत येथे बोलताना पाटील म्हणाले, मागील सरकार भाजप – सेनेचे नव्हते तर ते फक्त भाजपचे सरकार होते म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुणगाठ बांधली आणि भाजपची साथ सोडली आणि महाविकास आघाडीचे सरकार आले. आज राष्ट्रवादीचे आमदार सरकारबाबत अजित पवार असतील मी असेन आमच्याकडे तक्रार करतात मात्र जाहीर कधीच बोलत नाही. याचा अर्थ असा की महाविकास आघाडी मजबूत आहे.

आज महागाई तोंड आ वासून उभी आहे. पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहे, रोज दर वाढवले जात आहे. त्यावर भाजप काहीच बोलायला तयार नाही. पंतप्रधान महोदयांनी यातून हात काढून घेतला आहे. आपल्याला हेच जनतेपर्यंत पोहोचवायचे आहे, त्यासाठी आपल्याला कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करायची आहे आणि म्हणून पक्ष संघटनेवर भर द्यायचा आहे असे मार्गदर्शनही जयंत पाटील यांनी केले.

पालकमंत्री अदिती तटकरे या चांगलं काम करत आहेत. सरकारच्या माध्यमातून इथे विविध विकास कामे आपण करू. लोकांच्या समस्या सोडवून पक्षाला ताकद देण्याचे काम केले जाईल. उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आपण ताकदीने लढा असे आदेशही जयंत पाटील यांनी दिले.

गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याठिकाणी विकासात्मक कामे करत आला आहे. इथल्या प्रगतीसाठी अनेक प्रयत्न केले त्यात मोठ्या प्रमाणात यश आले असे सांगतानाच यामध्ये मला सुरेश लाड यांची साथ लाभली अशी स्पष्ट कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आणि त्यांच्या कामाचे कौतुकही केले.

रायगड भागात पूर आला तेव्हाही आपण सर्वांनी मिळून काम केले, एकजुटीने संकटाचा सामना केला. केंद्राकडून कोणतीही मदत मिळाली नाही मात्र मुख्यमंत्र्यांनी तौक्ते वादळ असेल किंवा पूर असेल तात्काळ मदत जाहीर केली याची माहिती देताना खासदार सुनिल तटकरे यांनी कर्जत शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले असल्याचे सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला जिल्हाध्यक्षा उमाताई मुंडे,युवक जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे, युवती जिल्हाध्यक्षा सायली दळवी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, खालापूर तालुकाध्यक्ष नरेश पाटील, कर्जत तालुकाध्यक्ष भगवान चंचे, कर्जत महिला तालुकाध्यक्षा रंजनाताई धुणे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment